News Flash

स्टीव्हन वेनबर्ग

विज्ञानातील काही वैचित्र्यपूर्ण संकल्पना लोकांपुढे मांडण्याची कला त्यांना साध्य होती

स्टीव्हन वेनबर्ग

विश्वातील मूलभूत कणांच्या वर्गीकरणाचा पाया असलेल्या प्रमाणित सिद्धांतामधील दोन महत्त्वाची बले ज्यांनी शोधून काढली, त्या स्टीव्हन वेनबर्ग यांचे या क्षेत्रातील योगदान सैद्धांतिक भौतिकशास्त्रात मोठेच होते. त्यामुळेच आपल्याला विश्वाचा झरोका किलकिला झाला. विसाव्या शतकात भौतिकशास्त्रावर अमीट ठसा उमटवणाऱ्या या वैज्ञानिकाचे नुकतेच निधन झाले. या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वेनबर्ग हे ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक होते. विज्ञानातील काही वैचित्र्यपूर्ण संकल्पना लोकांपुढे मांडण्याची कला त्यांना साध्य होती. ‘द फर्स्ट थ्री मिनिट्स- अ मॉडर्न व्ह्यू ऑफ द युनिव्हर्स’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. विश्वरचनाशास्त्रातील अनेक संकल्पनांचे विवेचन त्यात आहे. पुंज भौतिकीत स्थित्यंतरात्मक परिणाम करणारे त्यांचे संशोधन होते. विश्वात आपल्याला गुरुत्व, विद्युत चुंबकत्व ही बले माहिती आहेत, पण विसाव्या शतकात काही कमकुवत बले किरणोत्सर्जन घडवत असल्याचा शोध लागला. क्वार्क, प्रोटॉन, न्यूट्रॉन, लेप्टॉन यांसारखे अनेक कण सापडल्यानंतर म्युऑन्सचा शोध लागला. १९७६ च्या सुमारास वेनबर्ग यांनी आधी जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्या गॉज सिद्धांताचा वापर करून कमकुवत बलांतील क्रिया तपासल्या. अखेर नवीन सिद्धांत मांडताना त्यांनी न्यूट्रिनो व न्यूट्रॉन यांच्यासारख्या विद्युत उदासीनीकरण क्रियांचा उल्लेख करून,  डब्ल्यू व झेड बोसॉन तसेच फोटॉन यांच्यातला संबंध प्रस्थापित केला. त्यातून असे लक्षात आले की, उच्च ऊर्जा पातळीवर विद्युत चुंबकीय व इतर कमकुवत बले ही एकसारखीच असतात. यातून एकात्मिक सिद्धांत पुढे आला. १९६७ मध्ये वेनबर्ग यांनी ‘अ मॉडेल ऑफ लेप्टॉन्स’ हा शोधनिबंध लिहिला; त्याच वेळी पाकिस्तानचे अणुवैज्ञानिक डॉ. अब्दुस सलाम यांनी असेच संशोधन केले होते. त्यांच्या प्रारूपाला वेनबर्ग-सलाम प्रारूप म्हणतात. मूलभूत कणातील विद्युत चुंबकीय व कमकुवत बलांचे एकात्मीकरणच नव्हे तर मूलभूत कणांचे विद्युत भार व वस्तुमान यांचे वर्गीकरण त्यांनी केले. त्यातून पुढे प्रमाणित सिद्धांताचा पाया घातला गेला. त्यासाठी वेनबर्ग, सलाम व शेल्डन ली ग्लॅशहाऊ यांना १९७९ मध्ये नोबेल मिळाले. १९७२ पासून त्यांनी विश्वरचना शास्त्राचा अभ्यास सुरू केला होता. वेनबर्ग यांचा जन्म न्यूयॉर्कचा. कॉर्नेल विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन, डेन्मार्कला कोपनहेगन येथे सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांनी वर्षभर संशोधन केले. पुन्हा अमेरिकेतील प्रिन्स्टन, कोलंबिया, कॅलिफोर्निया विद्यापीठांत संशोधन तसेच हार्वर्ड व एमआयटीत काही काळ अध्यापन केले. धर्मावर त्यांचा विश्वास नव्हता. कारण विश्वाची रचना ज्या नियमांनी झाली, त्यांचा उलगडा विज्ञानच करू शकते, असा विश्वास त्यांना वाटत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 2:10 am

Web Title: steven weinberg nobel laureate in physics profile zws 70
Next Stories
1 सतीश काळसेकर
2 गोपाळराव मयेकर
3 जॉन वुडकॉक
Just Now!
X