करोनाच्या फैलावामुळे यंदा फ़ॉर्म्युला वन शर्यतींचा संपूर्ण हंगाम गुंडाळावा लागणार अशी चिन्हे आहेत. या काळवंडलेल्या वातावरणाला अधिक गडद करणारे वृत्त म्हणजे, विख्यात फ़ॉर्म्युला वन ड्रायव्हर स्टर्लिग मॉस यांचे निधन. ९० वर्षांचे आयुष्य म्हणजे एफ वनच्या परिभाषेत बोलायचे झाल्यास, एक प्रदीर्घ अशी ‘लॅप’! मॉस या खेळातील अजिंक्यसम्राट म्हणून ओळखले गेले. वास्तविक मॉस कधीही जगज्जेते बनू शकले नाहीत. चार वेळा ते उपविजेते राहिले, तर तीन वेळा तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तरीही लुइस हॅमिल्टनसारख्या विद्यमान आणि सहा वेळच्या जगज्जेत्यासाठी ते दैवतासमान आहेत. १९५१ ते १९६१ या काळात मॉस ६६ ग्राँप्रीमध्ये उतरले. १९५५ ते १९६१ या काळात ते जवळपास प्रत्येक वर्षी जगज्जेतेपदाचे दावेदार होते. ६६ ग्राँप्रींपैकी त्यांनी १६ जिंकल्या. व्हॅनवॉल (ब्रिटिश), मासेराटी (इटालियन) आणि मर्सिडिझ (जर्मनी) या मोटारींतून रेसिंग केले. तरीही ब्रिटिश मोटारीवर अंमळ अधिक प्रेम. ‘परदेशी मोटारीतून जिंकण्यापेक्षा ब्रिटिश मोटारीतून हरणे केव्हाही पसंत करेन,’ हा त्यांचा बाणा सध्याच्या व्यावसायिक युगात हास्यास्पद आणि अव्यवहार्य वाटण्याचीच शक्यता अधिक. जगज्जेतेपद कधीही मिळवता न आल्याचा विषाद मध्यंतरीची काही वर्षे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा व्यक्त होई. तरी त्यांच्या लोकप्रियतेच्या आड ही त्रुटी कधीही आली नाही. १९६२मध्ये गुडवुड येथील ग्राँप्रीमध्ये त्यांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. त्यातून ते कसेबसे वाचले, पण पुन्हा रेसिंगमध्ये उतरू शकले नाहीत. तरीही नंतर कित्येक वर्षे ब्रिटनमध्ये एखाद्याला भन्नाट वेगात मोटार चालवल्याबद्दल अडवल्यानंतर पोलीस विचारत, ‘स्वत:ला स्टर्लिग मॉस समजतोस?’! या सक्तीच्या निवृत्तीनंतरही मॉस एफ-वन आणि रेसिंगशी संबंधित राहिले. कधी व्यावसायिक म्हणून, कधी पत्रकार आणि संवादक म्हणून. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांना घरातच एक अपघात झाला. त्यातूनही ते लवकर बरे झाले आणि हिंडू-फिरू लागले. रेसिंगचे त्यांचे सूत्र सरळ साधे होते. प्रचंड वेगातच जायचे, मग पराभूत झालो तरी हरकत नाही. वेग कमी करून डावपेचात्मक शर्यती करणे त्यांना कधीच जमले नाही. १९६१मध्ये त्यांचे जगज्जेतेपद एका गुणाने हुकले. त्या वेळी हॉथ्रोन हा आणखी एक ब्रिटिश ड्रायव्हर जगज्जेता ठरला. जगज्जेतेपद हुकण्यापेक्षा, आपल्यासारख्याच एका ब्रिटिश ड्रायव्हरला ते मिळाले, याचेच समाधान मॉस यांना अधिक होते. हा भाबडेपणा त्यांना कर्कश व्यावसायिक, आढय़ताखोर चँपियन ड्रायव्हरांपेक्षा वेगळा ठरवून गेला आणि त्यांच्या अफाट लोकप्रियतेत सातत्याने भरच घालत गेला. पहिल्यांदा इटालियन मोटारातून रेसिंग करू लागले, त्या वेळी दूरध्वनी सूचिकेमध्ये त्यांनी आवर्जून स्वत:चा क्रमांक दाखल केला. कोणा ब्रिटिशाला आवडले नाही, तर खुशाल आपल्याला अभिप्राय कळवावा म्हणून!