भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या तिसऱ्या म्हणजे १९७१ मधील युद्धाचे स्वरूप आधीच्या युद्धांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. भारताने पूर्व पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी सेना पश्चिम विभागात आक्रमण करणार हे गृहीतच होते. हे दोन्ही युद्धक्षेत्र एकमेकांपासून दीड हजारहून अधिक किलोमीटर दूर. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कौशल्यपूर्वक नियोजन करणे आव्हानात्मकच. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराने इतक्या व्यापक स्वरूपात आखलेली ही पहिली युद्धमोहीम होती. त्यात दोन्ही क्षेत्रांत भारतीय सैन्यदलाचे पारडे जड राहिले. काही दिवसांच्या युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून बांगलादेशला मुक्त करण्यात यश मिळाले. भारताच्या लोंगोवाला चौकीवरील लढाई या युद्धात रोमहर्षक ठरली. तिचे नायक होते सुभेदार रतन सिंग. अतुलनीय पराक्रम गाजविणाऱ्या या युद्धनायकाचे वयाच्या ९२व्या वर्षी नुकतेच निधन झाले.

पंजाबमधील टिब्बा गावी हे त्यांचे मूळ गाव. २३ पंजाब रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. लोंगोवाला चौकीवर हल्ला करणे पाकिस्तानी सैन्याला महागात पडले. या चौकीवर कब्जा करण्याच्या नादात त्यांना ३४ रणगाडे व चिलखती वाहने आणि २०० जवान गमवावे लागले. दोन हजार सैनिक आणि ४५ रणगाडे-चिलखती वाहनांद्वारे चाल करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याशी अवघ्या १२० भारतीय सैनिक व अधिकाऱ्यांनी कडवी झुंज दिली.  ब्रिगेडिअर कुलदीप सिंग चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार रतन सिंग आणि सहकाऱ्यांच्या पराक्रमाने हे यश दृष्टिपथास आले. शत्रूने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याची माहिती मिळाल्यानंतर रतन सिंग व सहकाऱ्यांनी मार्गात सुरुंगपेरणीचे काम सुरू केले. लगोलग रणगाडाविरोधी तोफांचा रोख शत्रूच्या दिशेने वळविण्यात आला. रात्रीतून पाकिस्तानचे अनेक रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले.

सकाळी हवाई दलाचे पाठबळ मिळाल्यानंतर शत्रूला पुरती धोबीपछाड देण्यात आली. वाळवंटातील जैसलमेर जिल्ह्य़ातील लोंगोवाला चौकीवरील पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर ही पहिलीच अशी घटना होती की, एखाद्या सेनेवर एकाच दिवसात इतक्या मोठय़ा संख्येने रणगाडे गमाविण्याची नामुश्की ओढावली. या लढाईत सुभेदार रतन सिंग यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याची दखल घेऊन त्यांना तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते ‘वीरचक्र’ने सन्मानित करण्यात आले.

या रोमहर्षक संघर्षांवर आधारित ‘बॉर्डर’ चित्रपटामुळे लोंगोवालाची लढाई समस्त जनांपर्यंत पोहोचली; परंतु चित्रपट आणि वास्तव यातील तफावत घेऊनच. वास्तवातील लढाईत दोन भारतीय जवान शहीद झाले. अतिशय तुटपुंज्या बळावर लढल्या गेलेल्या या लढाईचे धडे आजही महाविद्यालयात दिले जातात. सुभेदार रतन सिंग यांची कामगिरी भारतीय सैन्याला चिरकाल प्रेरणा देणारी ठरेल.