गणितज्ञ व संगणक वैज्ञानिक अशी त्यांची खरी ओळख, गणित ही त्यांची लहानपणापासूनची आवड त्यांना त्या क्षेत्रात उंचीवर घेऊन गेली, त्यांना आता मॅकआर्थर फाउंडेशनची विद्यावृत्ती मिळाली आहे, त्यांचे नाव सुभाष खोत. या शिष्यवृत्तीत ४.१८ कोटींची रक्कम संशोधनासाठी काही वर्षांत दिली जाते. यावरून त्यांच्या संशोधनाचे महत्त्व लक्षात येते.

इचलकरंजीसारख्या लहान शहरात जन्मलेल्या खोत यांना घडवले ते त्यांचे गणिताचे शिक्षक वामन गोगटे यांनी. आजही खोत इचलकरंजीत आल्यावर त्यांना भेटल्याशिवाय जात नाहीत. एवढेच नव्हे तर ते ऑनलाइन संपर्कातही आहेत. दहावी-बारावीत खोत यांचा बोर्डात पहिला क्रमांक आला होता. त्यामुळे ते मुळातच प्रज्ञावान आहेत, यात शंका नाही. त्यांनी नंतर मुंबई आयआयटीतून संगणक विज्ञान विषयातून पदवी घेतली. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते परदेशात गेले. २००३ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी डॉ. संजीव अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विज्ञानात पीएच.डी. केली. २०११-१२ या काळात त्यांनी शिकागो विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणूनही काम केले.

Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
students draw class teacher sketch funny video
निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

त्यांचे मुख्य संशोधन हे संगणकीय व्यामिश्रता या क्षेत्रातील आहे. याचे उपयोग विविध क्षेत्रांत होऊ शकतात. २००२ मध्ये त्यांनी ‘युनिक गेम थिअरी’वर मूलभूत संशोधन केले. पी इज इक्वल टू एनपी याचा अर्थ एखाद्या प्रश्नाच्या उत्तराचा ताळा म्हणजे पडताळणी संगणक जेवढय़ा वेळात करतो, तेवढय़ाच वेळात तो एखाद्या प्रश्नाचे उत्तर सांगू शकतो का? खोत यांच्या ‘युनिक गेम काँजेक्चर’ सिद्धांताचे मूळ या प्रश्नात आहे, त्यातूनच भूमितीत नवीन सिद्धांत तयार झाले. निवडणूक पद्धतींची स्थिरता व ‘मॅथेमॅटिक्स ऑफ फोम्स’ यांचा अभ्यास त्यांच्या फोरियर विश्लेषणातून करता आला.

न्यूयॉर्क विद्यापीठातील कोरंट इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथॅमॅटिक्स या संस्थेत ते प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. आंतरराष्ट्रीय गणित संस्थेचा रॉल्फ नोव्हालिना पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याहीआधी, भारतात असताना १९९४-९५ अशा दोन वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय  गणित ऑलिम्पियाडमध्ये रजत पदक पटकावले होते.

त्यांचा युनिक गेम काँजेक्चरचा सिद्धांत खरा उतरला तर अनेक कठीण प्रश्नांची उकल होणार आहे. गणिताच्या मदतीने आव्हानात्मक सामाजिक प्रश्नही सोडवता येतात. त्यातील नवीन संशोधनासाठी त्यांना २००५ मध्ये मायक्रोसॉफ्ट न्यू फॅकल्टी फेलोशिप मिळाली होती. उदयोन्मुख वैज्ञानिक म्हणून त्यांना २०१० मध्ये अ‍ॅलन वॉटरमन पुरस्कार मिळाला होता. खोत यांचा सिद्धांत हा संगणक विज्ञानातील अनेक कूटप्रश्नांची उकल करण्यास उपयोगी ठरणार आहे पण त्यांचा सिद्धांत खरा सिद्ध करण्यासाठी अजून सगळी परिमाणे उपलब्ध नाहीत. पण जी काही परिमाणे उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून आपल्याला हा सिद्धांत वापरता येऊ शकतो.