अमूर्त चित्रशैली हे ‘आधुनिक कले’ला जगभर अनेक देशांत, एकाच वेळी आलेले फळ. या चित्रशैलीची कितीही चेष्टा जरी होत असली, तरी एक बाब मात्र पक्की आहे की, मूलत: पाश्चात्त्य मानल्या जाणाऱ्या आधुनिक कलेचा ‘युरोपीय’पणा फेकून देऊन देशोदेशींच्या मातीत जी काही अमूर्तता रुजलेली असेल, तिच्यातून उगवण्याची धमक या अमूर्त शैलीनेच दाखवली आणि त्या अर्थाने, आधुनिक कलेला जागतिक केले. हे मन्वंतर १९४० च्या दशकाअखेरीस घडले तेव्हा भारतात केसीएस पणिक्कर आणि शंकर पळशीकर हे भारतीय अमूर्तकलेच्या शोधात होते, तसेच तिकडे कोरियात सुह् से-ओक हेही कोरियात रुजलेल्या अमूर्ततेला आधुनिक कलारूप देऊ पाहात होते. ‘कोरियन अमूर्तकलेचे उद्गाते’ ठरलेल्या या से-ओक यांचे २९ नोव्हेंबरलाच निधन झाल्याचे वृत्त पाच डिसेंबर रोजी जगाला प्रथम कळले.

सुह् से-ओक यांचा जन्म १९२९ सालचा, ग्रामीण भागातला. तेथून सोलच्या (पूर्वीचे सेऊल) राष्ट्रीय विद्यापीठात ते कलाशिक्षणासाठी आले. कोरियन युद्धापूर्वीच्या १९४९ या वर्षांत त्यांनी सरकारी कलाप्रदर्शनात पहिले पारितोषिक मिळवले. पुढे १९५० पासून याच कला विभागात ते शिकवू लागले आणि १९५९ मध्ये त्यांनी समविचारी चित्रकार व विद्यार्थ्यांसह  ‘मुंग्निम्हो’ हा  कलासमूह स्थापन केला. अनेक कलासमूह अल्पजीवीच ठरतात, तसेच ‘मुंग्निम्हो’चे (१९५९ ते १९६४) झाले. परंतु अध्यापन आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम से-ओक यांनी अविरत केले. ‘कोरियन इंक’ (जपानी/ चिनी शाईसारखी) आणि कोरियातील पारंपरिक चित्रांसाठी वापरले जाणारे ब्रश तसेच तुतीच्या लगद्यापासून बनलेला कागद हे अस्सल देशी साहित्य वापरून त्यांनी आधुनिक, आंतरराष्ट्रीय कलाजाणिवेला आवाहन करणारी चित्रे केली. ही अमूर्त चित्रे सुलेखनकलेत (कॅलिग्राफी)  जशा रेघ-वेलांटय़ा असतात तशा वळणाने जाणारी, पण कोणतीही अक्षरे नसणारी होती. आकाराच्या पुनरावृत्तीतून पोत आणि लय निर्माण करणारी होती.  दक्षिण कोरियाचा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा पद्मश्रीसदृश पुरस्कार त्यांना २०१२ मध्ये मिळाला होता. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने अर्थातच देश-विदेशांत भरली होती.