‘मरायची अजिबात इच्छा नाही’, असे म्हणणारे अमेरिकेतील माध्यमसम्राट समनेर रेडस्टोन ९७ वर्षांचे होईपर्यंत मृत्यूला चकवत राहिले. व्हायकॉम, कोलंबिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, पॅरामाऊंट पिक्चर्स अशा बडय़ा कंपन्यांचे आधिपत्य ते करत होते. एमटीव्ही आणि निक्लेडोन अमेरिकी दूरचित्रवाणी विश्वाचा अविभाज्य भाग बनले, ते रेडस्टोन यांच्याच कारकीर्दीत. पण अनेक कंपन्यांच्या मागावर राहून त्यांना येनकेन मार्गाने गिळंकृत करणारा हा ‘उद्योगसैतान’ मात्र नव्हता. त्यांनी उच्चारलेले एकच वाक्य आज जगभरातील माध्यमांसाठी गुरुमंत्र ठरले. ते वाक्य होते : ‘कण्टेण्ट इज किंग.. आशय हाच राजा’!

त्यांची कारकीर्द म्हणावी तर मोठी विचित्र. अवघ्या अडीच वर्षांत त्यांनी हार्वर्डची पदवी मिळवली. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ. जपानी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे रेडस्टोन यांना अमेरिकी लष्कराच्या गुप्तवार्ता विभागात जपानी संदेशांच्या संकेतन (कोडिंग) जबाबदारीवर नेमण्यात आले. तीन वर्षे तेथे काम केल्यानंतर ते कायद्याची पदवी घेऊन एका सल्लागार कंपनीत रुजू झाले. पण तेथेही फार काळ न टिकता, रेडस्टोन यांनी त्यांच्या वडिलांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. रेडस्टोन यांचा चित्रपटगृहांचा व्यवसाय होता. समनेर रेडस्टोन यांच्या आगमनानंतर या व्यवसायाची भरभराट झाली. बहुपडदा चित्रपटगृहे आज नित्याचीच झाली आहेत. त्यांची सुरुवात रेडस्टोन यांनी केली. त्यांच्या माध्यमसाम्राज्याला आकार येऊ लागला त्या वेळेपर्यंत रेडस्टोन यांनी साठी ओलांडली होती. बहुतेकांचे हे निवृत्तीचे वय. चित्रपटगृहांपाठोपाठ करमणूकप्रधान वाहिन्या, वृत्तवाहिन्या, चित्रपट स्टुडिओ, संगीतवाहिन्या यांच्या खरेदीचा सपाटाच त्यांनी लावला.

उत्कट मंडळी बऱ्याचदा तऱ्हेवाईकही असतात आणि त्यांचे व्यक्तित्त्व हे एक बेट बनून जाते. अनेक प्रेयसी, पत्नी यांची सांगड घालतानाच रेडस्टोन यांनी प्रसंगी स्वत:च्या मुलांशीही कंपन्यांच्या नियंत्रणावरून उभा दावा मांडला होता. त्यात त्यांना काही गैर वाटायचे नाही. सीबीएस आणि व्हायकॉम या कंपन्यांना त्यांनी प्रसंगी स्वत:च्या अपत्यांपेक्षा अधिक ममत्वाने जपले, वाढवले. जिद्द, निर्धार यांच्याबरोबरच कशालाही हार न जाण्याची वृत्ती या गुणत्रयीच्या जोरावर रेडस्टोन यांची वाटचाल अथक सुरू राहिली. १९७९ मध्ये ते थांबले होते त्या हॉटेलला प्रचंड आग लागली. रेडस्टोन यांनी कसेबसे एका खिडकीला बाहेरून धरून ठेवले आणि ते बचावले. पण शरीराचा मोठा भाग होरपळला. त्यांच्या उजव्या मनगटावरील कातडी जळाली आणि त्याचा आकारच बदलला. आपण कधीही चालू वा उजव्या हाताने लिहू शकणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. पण रेडस्टोन नंतर चालू लागले, त्याच हाताने लिहू लागले आणि नंतर चक्क टेनिसही खेळू लागले! आयुष्याच्या उत्तरार्धातही कायदेशीर लढाया खेळण्याची खोड जिरली नाही, पण एकूणच माध्यम उद्योगातील बदल (उदा. ओटीटी) रेडस्टोन यांच्या पारंपरिक मानसिक घडणीला झेपणारे नव्हतेच. या काहीशा दु:खद जाणिवेतूनच त्यांनी कदाचित जगाचा निरोप घेतला असावा काय?