28 February 2021

News Flash

सुनील कुमार

तकीर्त ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मध्ये इतिहासाचे अधिव्याख्याता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली.

सुनील कुमार

इतिहासाचे प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थिप्रिय होते आणि विद्यापीठीय विद्वानांच्या वर्तुळातही, नवे विचार मांडणारे म्हणून परिचित होते. पण म्हणून काही ते केवळ विद्यापीठांमध्येच रमले असे नाही. ‘दिल्लीची सल्तनत’ हा त्यांचा अभ्यासविषय जणू दिल्लीवरील त्यांच्या प्रेमातून उमलला होता. ‘दिल्ली सल्तनत’ हे प्रमाणग्रंथ मानले जाणारे विद्यापीठीय पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी ‘द प्रेझेन्ट इन दिल्लीज पास्ट्स’ हे पुस्तकही लिहिले होते. उत्साहाचा झरा त्यांच्या शिकवण्या- वावरण्यात नेहमी दिसे..

..तो झरा अचानकच आटला, नाहीसा झाला. वयाच्या अवघ्या ६४ व्या वर्षी श्वसनसंस्थेच्या दुखण्याने (कोविड नव्हे)  सुनील कुमार यांचे निधन झाले. १७ जानेवारीची ती कुवार्ता हळूहळू सर्वदूर पसरली आणि ‘अगदी आतापर्यंत बास्केटबॉल खेळणारा सुनील असा अचानक गेला?’ ही हळहळ त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये दाटली.

दिल्लीत मुघलांचे आगमन झाले ते अर्थातच सोळाव्या शतकात, पण त्याहीआधी मुस्लीम राज्यकर्ते दिल्लीमध्ये होते. मुघल हे आक्रमणखोर होते आणि मंगोलियातून तुर्कस्तानापर्यंत त्यांच्या आक्रमक चढाया झालेल्या होत्या हे जरी खरे असले तरी या मंगोल टोळय़ा भारतात बाबरापासून पुढे स्थिरावल्या, त्याआधी हिंदुकुश ओलांडण्याची ऊर्मी निर्माणच कशी झाली, इथपासून मुस्लीम राजवटीबद्दलचे प्रश्न सुरू होतात. पण हे प्रश्न आणखी पुढे नेऊन, त्या वेळचा मजूरवर्ग कसा होता, गुलामीसदृश प्रथा होती काय.. किंवा, हिंदू आणि मुस्लीम यांचे संबंध स्थिरावत जाण्याचा काळ नेमका कसा होता, त्या काळातील शेती/ व्यापार व्यवहार कसे होते, या प्रश्नांचा शोधही सुनील कुमार यांनी घेतला.

‘दिल्ली विद्यापीठा’त इतिहासाचे विभागप्रमुखपद त्यांच्याकडे सप्टेंबर २०२० मध्ये आले आणि पुरेसे काम करण्यापूर्वीच ते गेले. ख्यातकीर्त ‘सेंट स्टीफन्स कॉलेज’मध्ये इतिहासाचे अधिव्याख्याता म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. मध्ययुगीन भारत व मध्य आशिया संबंधांवर पीएच.डी.साठी ते अमेरिकेत आधी शिकागोला, पुढे नॉर्थ कॅरोलायना येथील डय़ूक विद्यापीठात गेले. तेथे प्रा. जॉन रिचर्ड्स यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. तेथून मायदेशी परतून पूर्ववत ‘स्टीफन्स’ आणि पुढे दिल्ली विद्यापीठात ते शिकवू लागले, पण मध्यंतरी- २००८ ते २०१० या दोन वर्षांत- त्यांनी लंडनच्या ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अ‍ॅण्ड आफ्रिकन स्टडीज’ या प्रतिष्ठित संस्थेत अध्यापनकार्य केले. त्यांच्या जाण्याने इतिहासाकडे चिकित्सकपणे पाहणारा एक उमदा इतिहासकार आपण गमावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:01 am

Web Title: sunil kumar profile abn 97
Next Stories
1 शरू रांगणेकर
2 व्ही. शांता
3 उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ
Just Now!
X