हिंदी भाषेतील नामवंत साहित्यिक सुरेंद्र वर्मा हे नाटककार म्हणून जास्त ओळखले जातात, अलीकडेच बिर्ला फाऊंडेशनचा व्यास सन्मान त्यांना जाहीर झाला आहे. २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘काटना शमी का वृक्ष- पद्म पंखुरी के धार से’ या पुस्तकासाठी हा सन्मान मिळाला आहे.
शर्मा यांचा जन्म १९४१ मध्ये उत्तर प्रदेशातील झांशी येथे झाला. शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी लहान गोष्टी लिहिण्यापासून लेखनाला प्रारंभ केली. ‘सूर्य की अंतिम किरण से सूर्य की पहली किरण तक’ हे त्यांचे पहिले नाटक होते. सहा भाषांत त्याचे भाषांतर झाले आहे. कथा, नाटके, कादंबऱ्या, समीक्षा अशा प्रकारांत त्यांनी किमान पंधरा पुस्तके लिहिली आहेत. ‘मुझे चांद चाहिए’, ‘आठवा सर्ग’, ‘कैद ए हयात’ ही त्यातील काही पुस्तके. त्यांना १९९३ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तर १९९६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हिंदी नाटय़सृष्टीत मोहन राकेश व जयशंकर प्रसाद यांची संवेदनादृष्टी पुढील काळात विकसित करण्याची परंपरा सुरेंद्र वर्मा यांनी पार पाडली. समकालीन नाटककारांत वर्मा हे मोठे नाटककार आहेत. त्यांची ‘सेतूबंध’, ‘नायक खलनायक विदूषक’ व ‘द्रौपदी’ ही तीन नाटके १९७२ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर ‘रति का कंगन’मध्ये त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक माध्यमातून कामचेतना नाटय़प्रसंगातून दाखवताना विवाहामुळे आलेल्या कामसंबंधाच्या मर्यादा तोडल्या आहेत. त्यांच्या नाटक व कादंबऱ्यांतील या वर्णनावर प्रच्छन्न टीका झाली असली तरी त्यांनी त्यातून जी रंगभाषा निर्माण केली ती कुणालाही निर्माण करता आली नाही. किनाऱ्यावर राहून जीवनाचा अनुभव घेणाऱ्यांपैकी वर्मा हे नाहीत. त्यांनी जीवनातील वरचा झगमगाट तर पाहिला पण आत उतरून अंधाराचाही वेध घेतला. ‘सेतूबंध’ या गुप्तकालीन साम्राज्यावर आधारित नाटकातील प्रभावती आईला सांगते की, भावना के बिना शारीरिक संभोग बलात्कार हैं और मैं उसी का परिणाम हूँ. त्यांनी मूक बाहुलीसारखे जीवन जगणाऱ्या मुलींना बंडखोर होण्याचा संदेश दिला आहे. विश्वविद्यालयातील गुरू-शिष्य संबंधातील विकृततेवरही त्यांनी टीका केली आहे. ‘मुझे चाँद चाहिए’ या पुस्तकात त्यांनी स्त्रीचे पूर्ण अस्तित्व विकसित केले आहे, ते त्यांच्या वर्षां या पात्रातून जाणवते. ‘अंधेरे से परे’ या त्यांच्या कादंबरीत आधुनिक काळातील बदलती जीवनशैली दाखवताना कौटुंबिक समस्यांचे चित्रण केले आहे.
मोठय़ा शहरात आपली मूल्ये सोडून लोक कसे जगतात त्याचे चित्रण ‘दो मुर्दो के लिए गुलदस्ता’ या कादंबरीत आहे. त्यात दोघांपैकी एक जण मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये नाव कमावतो तर दुसरा अतृप्त महिलांना आपले शरीर देत असतो.‘शकुंतला की अंगूठी’ या नाटकात त्यांनी मानवी संबंधांचे बारकावे चित्रित केले आहेत. ‘जहॉँ बारिश न हो’ हा त्यांचा व्यंग निबंधसंग्रह आहे, त्यात निम्न वर्ग व मध्यम वर्ग यांची तुलना करतानाच विसंगतींवर बोट ठेवले आहेत. वर्मा हे बहुआयामी लेखक आहेत. त्यांच्या प्रतिभेमुळे ते जीवनाची खोली गाठण्यात यशस्वी होतात, त्यामुळेच त्यांच्या बहुतांश साहित्यकृती वाचकप्रिय ठरल्या..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2017 2:54 am