अवघ्या ३५ वर्षांपूर्वीचे राजकारण आज ‘गतशतकातले’ का वाटते, हे त्यांच्याकडे पाहून कुणीही सांगू शकायचे! कार्यक्षम असूनही ऋ जुता जपणाऱ्या, कुणालाही कधी न दुखावणाऱ्या आणि व्यक्तीची प्रतिष्ठा नेहमी जपणाऱ्या स्वरूपकुमारी बक्षी या केवळ विख्यात लेखिकाच नव्हत्या तर स्वातंत्र्यसैनिक होत्या. चारदा (१९७४, ७७, ८०, ८५) आमदार म्हणून आणि उत्तर प्रदेशच्या शिक्षणमंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांचा जन्म २२ जून १९१९ चा; म्हणजे आणखी सव्वादोन महिन्यांतच त्या शंभरी पूर्ण करणार होत्या! पण शतक गाठण्याआधीच त्यांचे निधन झाले.

पंडित बद्रिप्रसाद शिंगलु हे स्वरूपकुमारींचे वडील. काश्मिरी पंडितांचे हे कुटुंब लाहोरमध्ये आले. ‘नेहरूंइतके शिका’ असा आदर्श या कुटुंबातील मुलींसह सर्व अपत्यांपुढे होता. प्राथमिक शिक्षण लाहोरात घेऊन, महाविद्यालयीन शिक्षणासाठी उत्तर प्रदेशात आलेल्या स्वरूपकुमारी वयाच्या २३व्या वर्षी १९४२च्या चळवळीत सहभागी झाल्या, काही आठवडय़ांचा तुरुंगवासही त्यांनी सोसला; परंतु इंग्रजी आणि संस्कृतमधील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ‘नारी शिक्षा निकेतन कनिष्ठ महाविद्यालया’च्या प्राचार्य म्हणून १९४७ पासून त्या काम करू लागल्या. त्यांच्याच कारकीर्दीत हे महाविद्यालय वाढले आणि पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय येथे झाली. स्त्रीशिक्षण, कुटुंबनियोजन आणि त्या काळच्या उत्तर प्रदेशातील स्त्रिया-मुलींना स्वयंपूर्ण होता यावे यासाठी आधार देणे अशा प्रकारचे त्यांचे समाजकार्यही जणू आपोआपच वाढत गेले. या समाजकार्यामुळेच सत्तरच्या दशकात काँग्रेसच्या तिकिटावर त्या उत्तर प्रदेश विधानसभेत जाऊ शकल्या. मतदारसंघात घरोघरी- महिलांशी थेट संपर्कामुळे त्यांची लोकप्रियता दीड दशकांहून अधिक काळ अबाधित राहिली. उत्तर प्रदेशातील डाकूंना संपविण्याचे काम त्यांनी राज्याच्या गृहमंत्री या नात्याने (१९८५-८९) सुरू केले. डकैती-विरोधी अध्यादेशाद्वारे पोलिसांना विशेष अधिकार देऊन, डाकूंना संपविण्यात आले. त्यांच्याच या कारकीर्दीत, फूलनदेवीदेखील उत्तर प्रदेशातून कायमची पळाली आणि मध्य प्रदेशातच राहू लागली; परंतु मंत्री म्हणून केवळ हे पोलिसी कामच त्यांनी केले असे नव्हे. शिक्षण, महिला व बालकल्याण खात्यांच्या मंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीत ‘दीड किलोमीटरच्या आत प्राथमिक शाळा’ हा कायदा लागू होऊन ५०० शाळा निघाल्या, नऊ पदवी महाविद्यालये सुरू झाली आणि बुंदेलखंड, गढवाल आदी पाच विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली. एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या काळात निर्वाहवेतन सुरू झाले.

‘बक्षीदीदी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वरूपकुमारींना मिळालेले मानसन्मान मात्र, त्यांच्या ३० हून अधिक पुस्तकांतून प्रकटलेल्या साहित्य-सेवेबद्दलचे आहेत!