18 October 2019

News Flash

सिडनी ब्रेनर

दारिद्रय़ाचा शाप, त्यात दक्षिण आफ्रिकेतील हलाखीचे जीवन यातून बाहेर पडून वैद्यकातील नोबेलपर्यंत मजल मारता येऊ  शकते, असे क्वचितच कुणी मान्य करील; पण सिडनी ब्रेनर यांनी

सिडनी ब्रेनर

दारिद्रय़ाचा शाप, त्यात दक्षिण आफ्रिकेतील हलाखीचे जीवन यातून बाहेर पडून वैद्यकातील नोबेलपर्यंत मजल मारता येऊ  शकते, असे क्वचितच कुणी मान्य करील; पण सिडनी ब्रेनर यांनी हे करून दाखवले होते. एवढेच नव्हे, तर स्वत: त्या दुष्टचक्रातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी मागच्यांचा विचार करून वर्णद्वेषाविरोधातील लढाई सुरू ठेवत कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठी कायम निधी देऊ न आपण ज्या परिस्थितीतून आलो त्याची सदैव जाण ठेवली. रेणवीय जीवशास्त्राच्या सुवर्णकाळातील एक आघाडीचे शिलेदार म्हणजे ब्रेनर. सिंगापूरमध्ये त्यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांच्या संशोधनातून अल्झायमर (स्मृतिभ्रंश) व एड्स या रोगांची मानवाला असलेली समज वाढण्यात मदत झाली होती हे तर खरेच, पण १९५२ मध्ये जेम्स वॉटसन व फ्रान्सिस क्रिक यांनी डीएनएच्या चक्राकार रचनेचा शोध लावल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून जनुकीय संकेतावलीची संकल्पना मांडण्यात ब्रेनर आघाडीवर होते. या संकेतावलीनुसारच पेशीतील प्रथिनांना संदेश मिळत असतात व त्यावर आपल्याला कुठले रोग होणार हे ठरत असते.

केंब्रिजमध्ये त्यांनी १९६०च्या सुमारास सी इलेगन्स या एक मिलिमीटर लांब गोल कृमीवर संशोधन केले. हा कृमी पारदर्शक असतो. त्यासाठीच त्यांना २००२ मध्ये जॉन सुल्सटन व एच. रॉबर्ट हॉरवित्झ यांच्यासमवेत नोबेल मिळाले. अनेक रोगांच्या निदानात त्यांच्या संशोधनामुळे आमूलाग्र बदल झाले. आपल्या पेशींचे जीवनचक्र ठरवणाऱ्या आज्ञावलीचे काम कसे चालते हे त्यांनी दाखवून दिले होते. सी इलेगन्स हा जनुकीय क्रमवारी उलगडलेला पहिला प्राणी होता. आमच्या तिघांबरोबर नोबेलचा चौथा मानकरी हा सी इलेगन्स आहे, असे ते त्या वेळी गमतीने म्हणाले होते. ब्रेनर यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला. ज्यू आई-वडिलांचे ते पुत्र. त्या वेळी एक वाचनालय ब्रेनर यांच्या मदतीस आले. तेथे त्यांनी ‘दी सायन्स ऑफ लाइफ’ या एच. जी. वेल्स यांच्या पुस्तकाचे तीन खंड वाचले, तेव्हापासून त्यांना जीवशास्त्राची गोडी लागली. जोहान्सबर्ग येथे विद्यापीठातील शिक्षणानंतर त्यांनी सिरील हिन्सशेलवूड या ऑक्सफर्डमधील नोबेल विजेत्याच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली. १९५३ मध्ये केंब्रिज येथे कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत वॉटसन व क्रिक यांनी उलडगलेल्या डीएनए रचनेचे प्रारूप पाहायला ते गेले. तो त्यांच्या आयुष्यातील कलाटणी देणारा क्षण होता.  १९५७ मध्ये त्या प्रयोगशाळेत त्यांनी क्रिक यांच्यासमवेत काम सुरू केले. डीएनए व प्रथिने यांच्यात निरोप्याचे काम करणाऱ्या आरएनएचा शोध त्या वेळी त्यांनी फ्रान्स्वा जेकब व मॅथ्यू मेसेलसन यांच्यासमवेत लावला. केंब्रिज येथे त्यांनी वैद्यकीय संशोधन मंडळाचे नेतृत्व केले. नंतर कॅलिफोर्नियातील बर्कले येथे रेणवीय विज्ञान संस्था स्थापन केली. त्याचे ते संचालक होते. नंतर तेथील साल्क जैवअभ्यास संस्थेत ते काम करीत होते. नंतर सिंगापूर येथे त्यांनी रेणवीय व पेशी जीवशास्त्र संस्था सुरू केली. ‘करंट बायॉलॉजी’ या नियतकालिकात त्यांनी लिहिलेला ‘लूज एंड्स’ हा स्तंभ बराच गाजला होता.

First Published on April 20, 2019 3:52 am

Web Title: sydney brenner profile