24 January 2021

News Flash

टी. बी. सोळबक्कणवार

‘उत्सव गार्डन’ हे  हावेरी जिल्ह्य़ातील गोटागुडी येथे, ३० एकरांच्या जमिनीवर त्यांनी उभारलेले कलाग्राम

टी. बी. सोळबक्कणवार

पुण्याच्या पाषाण भागातील ‘ग्रामसंस्कृती पार्क’पासून ते बेंगळूरुच्या जक्कूर भागात उभारले जात असलेल्या ‘मॉडेल व्हिलेज’पर्यंत; तसेच हुबळी, हावेरी, शिमोगा, बेळगाव, बागलकोट या पट्टय़ात अनेक ठिकाणी टी. बी. सोळबक्कणवार यांची छाप आता उरली आहे. आबालवृद्ध सर्वसामान्यांना ‘चटकन समजणारे’ शिल्पसमूह उभारून, त्यातून मानवी जीवनानुभव पोहोचवणारे ‘उत्सव गार्डन’, ‘आलमट्टी गार्डन’, ‘कृष्णा पार्क’, ‘लव-कुश पार्क’ ही त्यांची निर्मिती. ‘समकालीन लोक-शिल्प’ असे ज्या कलाकृतींचे वर्णन करता येईल, अशा अनेक कलाकृती घडवणारे सोळबक्कणवार गेल्या गुरुवारी, १९ रोजी निवर्तले.

‘उत्सव गार्डन’ हे  हावेरी जिल्ह्य़ातील गोटागुडी येथे, ३० एकरांच्या जमिनीवर त्यांनी उभारलेले कलाग्राम. मोठय़ांना २०० आणि लहानांना १०० रुपये तिकीट असूनही इथे लोक येतात, कारण इथली हजाराहून अधिक लहानमोठी शिल्पे! साधी आणि कलादृष्टय़ा कामचलाऊच म्हणावीत अशी ही सिमेंटची, ऑइलपेंट (एनॅमल) वापरून रंगवलेली  शिल्पे असली, तरी उदाहरणार्थ ‘गावची जत्रा’ या सुमारे ३०० मानवशिल्पांचा समूह पाहून दाद मिळतेच, असे सोळबक्कणवार यांचे काम! या ३० एकर जमिनीपैकी काही जमीन त्यांची वडिलोपार्जित होती, असे सांगितले जाते. याच भागात १९४७ साली टी. बी. सोळबक्कणवार जन्मले. गावातच शिकले आणि धारवाडला डी. व्ही. हळभावी यांच्या कलासंस्थेत (आताचे जेएसएस हळभावी स्कूल ऑफ आर्ट) शिकून मुंबईच्या ‘सर ज जी कला महाविद्यालया’त प्रवेश घेण्यासाठी आले. प्रवेश मिळाला, पण ‘इंटीरिअर डिझाइन’ या अभ्यासक्रमाला. तो पूर्ण करून आधी कन्नड चित्रपट क्षेत्रात सेट-उभारणीचे काम, मग एका कन्नड नियतकालिकासाठी चित्रे काढणे असे सोळबक्कणवारांनी सुरू केले, पण दावणगिरीच्या कलाशाळेत अध्यापकाची नोकरी (१९७२ ते ९०) मिळाल्याने आयुष्याला स्थैर्य लाभले. बैलाटा, दोड्डाटा या नावांनी ओळखले जाणारे यक्षगानसदृश पण लोकनाटय़ासारखे कला प्रकार जतन व्हावेत, म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. ‘उत्सव’ची जमीन त्यासाठी वापरायची, हेही ठरवले होते. पण नोकरीत असतानापासून उभारलेले सिमेंट-पुतळे आता मोठय़ा प्रमाणावर उभारावेत, असे त्यांच्या मनाने घेतले आणि माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने ते कार्यरत झाले. ग्रामीण जीवनाचे दर्शन ही मुख्य कल्पना, पण त्यासह ‘एकता’ (७० हून अधिक पुतळे), बालपण (२५ पुतळे) अशा विषयांवरील समूहशिल्पेही त्यांनी केली. जक्कूर येथील महात्मा गांधी ग्रामीण ऊर्जा व विकास संस्थेच्या (एमजी आरआयडी) आवारातील ‘विकसित गावा’चे कल्पनाशिल्प, हे त्यांचे अखेरचे काम ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 12:06 am

Web Title: t b solabakkanavar profile abn 97
Next Stories
1 अजय देसाई
2 मेजर जनरल आर. एन. छिब्बर (निवृत्त)
3 मृदुला सिन्हा
Just Now!
X