नवस्वतंत्र भारताला ज्याप्रमाणे काही अत्यंत निष्ठावान आणि द्रष्टय़ा राजकीय नेत्यांनी शाश्वत लोकशाहीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली, त्याच प्रकारे शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाची घडी घालून देण्यात त्या काळातील काही अत्यंत तोलामोलाच्या अर्थतज्ज्ञांचाही वाटा होता. अमर्त्य सेन, जगदीश भगवती, वि. म. दांडेकर, नीलकंठ रथ, सुरेश तेंडुलकर, दीना खटखटे, एम. नरसिंहम या विभूतींच्या मांदियाळीतले एक महत्त्वाचे नाव होते टी. एन. श्रीनिवासन यांचे.

सर्वसामान्यांसाठी समजावून सांगायचे झाल्यास श्रीनिवासन यांचे अत्यंत क्रांतिकारी योगदान म्हणजे, व्यापार उदारीकरणातील संशोधन/ विश्लेषणाच्या माध्यमातून त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना आर्थिक उदारीकरणाची प्रेरणा आणि दिशा दिली!  विख्यात अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या नजरेतून खरा अर्थतज्ज्ञ हा प्रथम गणिती असायला हवा. श्रीनिवासन यांनी गणित विषयामध्येच मद्रास विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे कोलकात्यामधील भारतीय सांख्यिकी संस्थेत त्यांनी संख्याशास्त्रविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. मुंबईत सांख्यिकी विश्लेषकाच्या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यांनी अर्थशास्त्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच मग अमेरिकेतील जगप्रसिद्ध येल विद्यापीठात पदव्युत्तर आणि पीएच.डी. करण्याची संधी त्यांना मिळाली. सेन, भगवती यांच्याप्रमाणेच अमेरिकेत त्यांच्या संशोधनाला नवा आयाम लाभला. विकास अर्थशास्त्रातील त्यांच्या नैपुण्यामुळे जागतिक बँकेबरोबर काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिकन इकॉनॉमेट्रिक सोसायटी, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये ते ‘फेलो’ होते. अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच श्रीनिवासन यांचे आणखी एक गुणवैशिष्टय़ म्हणजे मिस्कील परखडपणा. अमेरिकेत बराच काळ घालवूनही भारतात नियोजन मंडळ, विविध अर्थतज्ज्ञ, राजकारण्यांशी ते संपर्कात असत आणि अनेकदा मार्गदर्शन करीत. भारतीय अर्थशास्त्रज्ञांकडून सादर होणारे शोधनिबंध म्हणजे आत्मप्रौढीपलीकडे काहीही नसते, असे वादग्रस्त विधान त्यांनी एकदा केले होते. २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. वयाच्या ८५व्या वर्षी, रविवारी त्यांचा जीवनप्रवास थांबला; पण विकास अर्थशास्त्र आणि व्यापार उदारीकरणाविषयी त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच महत्त्वाचे ठरतात.