लोककलांचा इतिहास कितीही देदीप्यमान असला, तरी त्याचे वर्तमान मात्र चिंतेने ग्रासलेले असते. मराठी चित्रपटातून तमाशाची सद्दी संपल्यानंतर हा कला प्रकार केवळ फडांपुरताच मर्यादित राहिला. त्यामुळे त्याचे अर्थकारणही बदलले आणि तमाशा कलावंतांच्या भाळी विपन्नावस्थेचे सावटही आले. तमाशासम्राज्ञी शांताबाई काटे या अशाच कलावंतांपैकी एक.

तमाशाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या तुकाराम खेडकर यांच्या प्रेरणेने त्या तमाशा या लोककलेच्या चरणी रुजू झाल्या. ५०-६० वर्षांच्या कलासेवेनंतर शांतामावशी शेवटी अकोले तालुक्यातील नातसुनेकडे राहत होत्या. त्या मूळच्या शेवगाव तालुक्यातील आख्खी कोरडगावच्या. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी शेतात खुरपायला जाणाऱ्या शांता नावाच्या या देखण्या मुलीला बघून एकाने तिला तमाशात पाठवण्याचा सल्ला दिला.  शांताबाई तमाशाच्या फडात उतरल्या. सुरुवातीला नाशिक जिल्ह्य़ातल्या एका तमाशात १० वर्षे शांताबाईंनी काम केले. त्या वेळी मुंबईत माधवराव नगरकर यांचा तमाशा जोरात होता. शांताबाईंनी एक दिवस मुंबई गाठून नगरकरांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांच्या रूपावर नगरकर भाळले. नगरकर आणि शांताबाई काटे या जोडीने तब्बल ३० वर्षे तमाशा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मुंबईतल्या अनेक गाजलेल्या तमाशा फडातून त्यांनी काम केले. महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, संत तुकाराम अशी वगनाटय़े बघायला रसिक गर्दी करायचे. शांताबाई तब्बल पावशेर वजनाचे खऱ्या सोन्याचे दागिने घालून मिरवायच्या. कुणी अडला नडला भेटला की अंगावरचा एखादा दागिना सहज काढून द्यायच्या. माधवराव नगरकर यांच्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, कांताबाई सातारकर यांच्या नावाजलेल्या तमाशांमध्ये शांतामावशींनी फड गाजवले. हलाखीच्या परिस्थितीतही त्या स्वाभिमानाने जगल्या. चरितार्थासाठी त्या दहा टक्के व्याजाने पैसे कर्जाने घेत व आपले तुटपुंजे मानधन आले की त्यातून त्या परतफेड करीत आणि पुन्हा कफल्लक होत, असे हे विपन्नावस्थेचे दुष्टचक्र सतत सुरू राहिले. मानलेल्या मुलीनेही त्यांना वाऱ्यावर सोडले.  त्यामुळे लोकांनाच त्यां8च्यावर अंत्यसंस्कार करायची वेळ आली. एकेकाळी लोकांचे मनोरंजन करून त्यांची वाहवा मिळवणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या तमाशासम्राज्ञीची मृत्यूनेच सुटका केली व एका शोकांतिकेचा अखेरचा अंक संपला.