21 January 2018

News Flash

तहमिना जान्जुआ

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी परराष्ट्र नीतीकडे गांभीर्याने लक्ष दिले होते.

लोकसत्ता टीम | Updated: February 22, 2017 2:21 PM

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी परराष्ट्र नीतीकडे गांभीर्याने लक्ष दिले होते. यातूनच परराष्ट्र सेवेत देशभरातील बुद्धिमान व मुत्सद्देगिरीत आपली छाप पाडू शकणारे अधिकारी नेमले गेले. महिलांची संख्याही यात लक्षणीय होती. चोकिला अय्यर, निरुपमा राव आणि सुजाता सिंह या तीन महिला तर परराष्ट्र सचिव या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या.  आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात मात्र ७० वर्षांनंतर तहमिना जान्जुआ यांना देशाची पहिली महिला परराष्ट्र सचिव बनण्याचा मान मिळाला आहे. भारत-पाक संबंधांत कमालीचा तणाव निर्माण झालेला असताना त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आल्याने त्यांच्यासाठी मार्चपासूनचा काळ कसोटीचा राहणार आहे.

पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बासित यांच्या नावाची या पदासाठी खूप चर्चा झाली, परंतु पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी तहमिना यांच्या नावाला पसंती दिली. १९८४ मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवेत दाखल झालेल्या तहमिना यांनी गेल्या ३३ वर्षांत विविध पदे भूषविली आहेत. त्यांनी कायदेआझम विद्यापीठातून फ्रेंच साहित्यामध्ये पदवी मिळवली असून आंतरराष्ट्रीय राजकारणात रस असल्याने त्या मग कोलंबिया विद्यापीठात गेल्या. तेथून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. सुरुवातीला त्यांनी न्यूयॉर्कमधील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात सेवा बजावली.  तेथील कार्यकाळ संपल्यानंतर तहमिना यांना परराष्ट्र मंत्रालयातील सामरिक धोरणांचे नियोजन करणाऱ्या कक्षात नियुक्त करण्यात आले. तेथे त्या महासंचालकपदापर्यंत पोहोचल्या. २०१०-११ या काळात परराष्ट्र मंत्रालयाच्या त्या मुख्य प्रवक्त्या होत्या. जगभरातील माध्यमांसमोर आपल्या परराष्ट्र धोरणांचे समर्थन करण्याचे त्यांचे कसब तेव्हा अनुभवायास मिळाले. नंतर तहमिना यांना इटालीत पाठवण्यात आले. २०१५ पर्यंत त्या तेथील पाकिस्तानच्या राजदूत होत्या.

२०१६ मध्ये शरीफ यांनी त्यांना पुन्हा संयुक्त राष्ट्र संघात पाठवले ते तेथील पाकिस्तानचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून. आजही त्या याच पदावर असून मार्चमध्ये त्या परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारतील. पाकिस्तानात गेल्या काही वर्षांत इमामुल हक, शाह मेहमूद कुरेशी आणि हीना रब्बानी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यापैकी कुणालाही या पदाला न्याय देणे जमले नाही. गेल्या चार वर्षांपासून शरीफ यांना मुरब्बी व जाणकार नेता परराष्ट्र खात्यासाठी न मिळाल्याने हे खातेही त्यांच्याचकडे आहे. पंतप्रधान कार्यालयातूनच ते परराष्ट्र खात्याचा कारभार पाहतात. तसेही रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयातूनच पाकिस्तानची परराष्ट्र धोरणे निश्चित होतात असेच मानले जाते. भारत, अफगाणिस्तान आणि इराण या शेजारी देशांशी पाकिस्तानचे संबंध चांगले नाहीतच. याचा परिणाम व्यापारावरही होत आहे. दहशतवाद हा सबंध जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. पाकिस्तानही त्यात होरपळतो आहेच. पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री नेमावा असे पाकिस्तानला अनेक देशांनी सुचवले असले तरी शरीफ यांनी ते मनावर घेतलेले नाही, तर भारताने आपले परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांना अलीकडेच मुदतवाढ दिली आहे. अशा सर्व परिस्थितीत तहमिना यांच्यावर परराष्ट्र सचिवासारख्या संवेदनशील पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे कारकीर्दीच्या या अखेरच्या पर्वात त्यांच्या मुत्सद्देपणाची कसोटी लागणार आहे..

First Published on February 17, 2017 2:40 am

Web Title: tehmina janjua
  1. No Comments.