‘अत्यंत अपरिचित’ अशी पहिली प्रतिक्रिया थन्डिका एम्कान्डविरे या नावाबद्दल मराठी वाचकांकडून येणे  साहजिक असले, तरी आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेतील काही हजार अर्थतज्ज्ञांमध्ये हे नाव मानाने घेतले जाई. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आणि संयुक्त राष्ट्रांच्या सामाजिक विकास संशोधन संस्थेतील (यूएनआरआयएसडी) तज्ज्ञ अशा प्रतिष्ठेच्या पदांवर काम केलेले प्रा. एम्कान्डविरे हे  एकात्म आफ्रिकावादाला गती देणारे अभ्यासक होते. त्यांचे निधन २७ मार्च रोजी झाले.

‘आफ्रिका इज अ कंट्री’ यासारख्या लोकप्रिय घोषणांतून, जगातील तब्बल ५४ देशांना सांधणाऱ्या या मोठय़ा खंडाचे एकात्मीकरण अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतच असतो. पण आफ्रिकेचे हे एकात्मीकरण का हवे आणि कसे हवे, याची साधार मांडणी होण्यासाठी एम्कान्डविरे यांनी पुढाकार घेतला. १९७८ साली, म्हणजे मंडेला तुरुंगात आणि झिम्बाब्वेसारखे देश पारतंत्र्यात होते तेव्हा, प्रा. एम्कान्डविरे यांनी सेनेगलची राजधानी डकार येथे आज ‘कोडसेरिआ’ या लघुनामाने ओळखली जाणारी ‘कौन्सिल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सोशल रीसर्च इन आफ्रिका’ ही संस्था स्थापण्यात मोठा हातभार लावला. या संस्थेमध्ये १९९६ पर्यंत त्यांनी अनेक पदे निव्वळ भूषवली नाहीत तर कित्येक आफ्रिकी तरुणांना अभ्यासाची दिशा दिली, तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिले.

त्यांचा जन्म १९४० सालचा, आजच्या झिम्बाब्वेतला. मात्र शिक्षणासाठी ते मलावी या देशात गेले. तेव्हा ‘न्यासालँड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलावीत ब्रिटिश सत्तेविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढय़ातही ते सहभागी होते. मात्र पुढे शिष्यवृत्तीवर, अमेरिकेतील ओहायो विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. तेथून स्टॉकहोम विद्यापीठात, मग पुन्हा झिम्बाब्वेत, असा त्यांचा प्राथमिक प्रवास झाला.  १९८० च्या दशकानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व अन्य संस्थांमध्ये अध्यापनाच्या तसेच संशोधनाच्या संधी मिळत गेल्यामुळे ते प्रामुख्याने युरोपातच राहिले. त्यांनी पुढे स्वीडनचे नागरिकत्वही स्वीकारले. वयाच्या सत्तरीनंतरही स्टॉकहोम विद्यापीठात आजीव प्राध्यापक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या ‘आफ्रिका विकास अध्यासना’चे प्रमुख, ही पदे त्यांच्याकडे होती.

आफ्रिकेतील गरिबी, ती दूर करण्याचे उपाय आणि कल्याणकारी अर्थव्यवस्था राबवतानाच जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकण्याची धडपड सार्थ करणे ही आर्थिक आव्हाने नेमकी ओळखणाऱ्या प्रा. एम्कान्डविरे यांनी, आफ्रिकी देशांमधील सामाजिक-राजकीय समस्याही जाणल्या होत्या. त्यातूनच ‘मंडेला यांच्या निधनानंतर आफ्रिकेतील स्वातंत्र्यसंघर्षांचा काळ संपून आर्थिक संघर्षकाळ सुरू झाला’ यासारखी मते ते मांडत. आफ्रिकेसंदर्भात, एकात्मीकरण हे वैविध्य जपूनच साधावे लागेल. मग आर्थिक आव्हानही विविध उत्तरांनी पेलायचे की एकच उत्तर लागू पडेल? यासारख्या प्रश्नांची चर्चा करणारे ‘आफ्रिकन इंटलेक्च्युअल्स : रीथिंकिंग पॉलिटिक्स, लँग्वेज, जेंडर अँड डेव्हलपमेंट’ हे त्यांचे पुस्तक (२००५) अर्थशास्त्रीय परिघाबाहेर पाहणारे होते. मात्र त्यांची अन्य पुस्तके व निबंध अर्थशास्त्रातील त्यांची गुणवत्ता प्रकट करणारी आहेत.