‘नादिष्ट’ हे विशेषण विनाकारण नकारात्मकपणे वापरणे किती चुकीचे आणि खरा नादिष्ट माणूस किती उत्तुंग प्रतिभेचा असतो, याची मूर्तिमंत साक्ष म्हणजे तंजावुर व्ही. शंकर अय्यर. कर्नाटक संगीतातील गायक, वीणावादक, गुरू आणि नव्या गानकृतीच नव्हे तर नवे रागही निर्माण करणारे ‘कृती’कार अय्यर हे पक्षाघातानंतर वयाच्या ९७ व्या वर्षी तिरुनेलवेलीमध्ये निवर्तले. त्यांना आदरांजली वाहाताना अनेक संगीतविद्वानांनी आठवणी उजळल्या, त्या अय्यर यांच्या लोभस ‘नादिष्ट’ पणाच्याच! ऐकणे, ऐकलेले नेमके लक्षात ठेवणे आणि ते कंठस्थ करून जसेच्या तसे ऐकविणे ही नादिष्टाची आद्यखूण तर अय्यर यांनी नव्वदीतही जपली होतीच, पण त्याआधी कर्नाटक संगीताचे निराळेपण आणि त्याची शुद्धता टिकवून हे संगीत वाढते ठेवण्याचा ध्यासही त्यांनी घेतला होता. त्यामुळेच मग, प्रख्यात नागस्वरम वादक टी. राजरत्नम पिल्लै तंजावुरला आले असता त्यांच्या भेटीस गेलेल्या अय्यर यांना ‘तुमच्यासाठी काय वाजवू’ असे पिल्लै यांनी विचारताच ‘नाटकप्रिया’ रागाची फर्माईश अय्यरांनी केली आणि वाद्याचे ते सूर कर्णसंपुटांत साठवून घरी येताच ‘गीत वाद्य नटन’ या गाजलेल्या कृतीची निर्मिती, अर्थातच नाटकप्रिया रागात अय्यर यांनी केली.. असे अनेक किस्से त्यांच्याविषयी सांगितले जातात. ‘विष्णुप्रिया’ आणि ‘हंसकल्याणी’ या रागांची नवनिर्मिती त्यांनी केली होती. शिवाय, ‘रेवती’सारख्या इतरही रागांचा मूळ कर्नाटकी ढंग टिकावा, त्यांच्यावरील ‘हिंदुस्तानी’ प्रभाव उतरावा, यासाठी नव्या कृतींची रचनाही त्यांनी केली. कर्नाटक संगीतातील गानकृती ही हिंदुस्तानी संगीतातील बंदिशीपेक्षाही घट्ट. बंदिश अस्ताई-अंतरा यांच्या सुरावटींचा आराखडा देते, पण ‘कृती’ त्याहीपुढे जाऊन- रागम्, तालम, पल्लवी, अनुपल्लवी यांचा पट मांडून न थांबता सरगम कुठे घ्यावी आणि तान किती घ्यावी हेही ठरवून देते. त्यामुळे व्हायोलिन वा नागस्वरमवर सादर केली, तरी कोणतीही कृती गात्या गळ्यातूनच आल्यासारखी वठते. या गानकृती तेलुगु किंवा संस्कृतमध्ये सहसा केल्या जातात पण अय्यर यांनी तमिळमध्येही रचना केल्या. त्यांची कारकीर्द सातहून अधिक दशकांची असल्याने अनेकांना त्यांच्या रचना ‘पारंपरिक’ वाटतात. त्यांच्या एकंदर रचनांची संख्या शंभराच्या घरात असावी, त्यापैकी किमान ५० रचना दोन पिढय़ांच्या गायक-वादकांनी कंठस्थ, वाद्यस्थ केल्या. नावातले ‘तंजावुर’ हे त्यांचे मूळ गाव नव्हे. सरफोजीराजे भोसले यांनी कलासमृद्धतेचा वारसा दिलेल्या या नगरीत अय्यर शिकले. ब्रह्मचारी राहून येथेच त्यांनी संगीतसाधना केली आणि या नगराचे नावही स्वीकारले. त्यांना मिळालेल्या सन्मानांत २०११ चा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार महत्त्वाचा ठरला. त्यांच्या जाण्याने भारतातील संगीताची हानी झाली आहे.