X

टॉम आल्टर

टॉम आल्टर यांचे आजोबा अमेरिकेतून भारतात तेही पाकिस्तानात स्थायिक झाले.

सृजनाची अनेक रूपे एकाच व्यक्तिमत्त्वात एकवटावीत, असा अनुभव देणारी माणसे दुर्मीळच असतात. त्यातही परिस्थिती आणि प्रत्यक्ष जगण्यातील विरोधाभास ठळक असतानाही केवळ सृजनाच्या बळावर ते अंतर मिटवणारा निळ्या डोळ्यांचा अवलिया म्हणून टॉम आल्टर यांचा चेहरा कायम रसिकांच्या स्मरणात राहील. या माणसाची वाडवडिलांपासूनची मुळं परदेशी होती, त्यामुळे अगदी चेहऱ्यानेच दूरदेशीचा वाटणाऱ्या टॉम आल्टर यांचा आत्मा मात्र शुद्ध देशी होता. त्यामुळे बॉलीवूडचा राजेश खन्ना होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या टॉम आल्टर यांनी आपल्या अस्खलित हिंदी आणि उर्दूच्या बळावर रंगमंचावर अभिनयाचा अस्सल मुशायरा रंगवला.

टॉम आल्टर यांचे आजोबा अमेरिकेतून भारतात तेही पाकिस्तानात स्थायिक झाले. फाळणीनंतर त्यांचे आजोबा टॉम आल्टर यांचे आजोबा अमेरिकेतून भारतात तेही पाकिस्तानात स्थायिक झाले.पाकिस्तानात आणि त्यांचे वडील भारतात हिमाचल प्रदेशात स्थायिक झाले. खुद्द टॉम यांचा जन्म भारतातील असल्याने त्यांची वैचारिक जडणघडण ही या मातीतलीच होती आणि ते शेवटपर्यंत या मातीतीलच कलाकार राहिले. राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ चित्रपट पाहून आपणही त्याच्यासारखे अस्सल देशी सुपरहिरो व्हायचे हा ध्यास घेऊन ते मुंबईत आले आणि इथे येऊन रुपेरी पडद्यावर कलाकार म्हणून ते नावारूपालाही आले. पण खऱ्या अर्थाने ते नाटकात रंगले. त्यामागे कारणंही तशीच होती. अभिनयाच्या ध्यासाने झपाटलेल्या टॉम आल्टर यांनी प्रशिक्षणासाठी पुण्यात ‘एफटीआयआय’मध्ये (फिल्म टेलिव्हिजन अँड इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) प्रवेश घेतला. रोशन तनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे अभिनयाचा धडा गिरवणाऱ्या टॉम यांना नसिरुद्दीन शहा, बेंजामिन गिलानी आणि शबाना आझमी यांच्यासारखी कलाकार मंडळी सहाध्यायी म्हणून लाभली होती. नसिरुद्दीन शहा आणि बेंजामिन गिलानी यांच्याबरोबर त्यांचे सूर जुळले ते कायमचे. १९७७ साली टॉम आल्टर यांनी पहिला हिंदी चित्रपट केला. मात्र त्यानंतर दोनच वर्षांनी टॉम यांनी नसिरुद्दीन शहा, बेंजामिन या आपल्या मित्रांबरोबर ‘मोटली प्रॉडक्शन्स’ या नाटय़संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आत्तापर्यंत गेली चाळीस वर्षे टॉम आल्टर आपल्या सहजाभिनयाने रंगमंचावर तळपत राहिले.

उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व हे त्यांच्या रंगमंचीय आविष्काराचे मुख्य अस्त्र होते. त्यांचा आजवरचा सगळ्यात गाजलेला नाटय़प्रयोग म्हणून ‘मौलाना’ या नाटकाचा उल्लेख करावा लागेल. अडीच तासांचा हा एकपात्री नाटय़प्रयोग कोणत्याही भव्यदिव्य प्रॉपर्टीशिवाय फक्त आणि फक्त टॉम यांचा अभिनय, त्यांचे संवाद या बळावर जिवंत होत असे. ‘बाबर की औलाद’, ‘लाल किले का आखरी मुशायरा’, ‘गालिब का खत’, ‘तीसवीं शताब्दी’, ‘कोपनहेगन’, ‘द गालिब इन दिल्ली’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. प्रेक्षकांच्या नजरेत थेट नजर मिळवून संवादफेक ही त्यांची खासियत होती. कायम सळसळत्या उत्साहाने भारलेल्या या निळ्या डोळ्यांच्या अभिनेत्याला आपल्याकडच्या प्रेक्षकांनी कधी ‘हिरो’ म्हणून स्वीकारले नाही, पण म्हणून त्यांची अभिनयाची गाडी कुठे थांबली नाही. कधी ‘शतरंज के खिलाडी’ तर कधी ‘आशिकी’ असा समांतर-व्यावसायिक चित्रपटांचा दोर सांभाळत त्यांनी ही तारेवरची कसरतही आनंदाने अनुभवली. टेलिव्हिजन माध्यमावरही त्यांनी आपली पकड कायम ठेवली. ‘जुनून’, ‘भारत एक खोज’, ‘जबान संभाल के’, ‘शक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’, ‘यहाँ के हम सिकंदर’ या त्यांनी केलेल्या मालिकांवर नजर टाकली तरी त्यातले वैविध्य सहज लक्षात येते. अभिनय, पत्रकारिता, लेखन आणि उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या या सृजनसंपन्न अवलियाच्या जाण्याने त्याने रंगवलेला मुशायरा संपला असला तरी त्याच्या आठवणी लाखो रसिकांच्या मनात अजरामर आहेत.

Outbrain