‘राजकीय कार्यकर्ते व युद्धविरोधी चळवळीचे नेते’ अशी ओळख असल्यास अडवणूक करणारे ‘देशप्रेमी’ संशयात्मे अमेरिकेतही होते.. टॉम हेडन यांना या संशयी देशप्रेमींमुळेच, विद्यापीठात पदवीदानाच्या वेळी प्रवेश नाकारण्यात आला होता आणि नेवार्कमध्ये त्यांचे वास्तव्य असताना एफबीआयने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. व्हिएतनाम युद्धाविरोधी चळवळीत टॉम हेडन अग्रेसर होते. ‘शिकागो खटल्यातील आरोपी क्रमांक सात’ अशीही त्यांची एक वेगळी ओळख. १९६८ मध्ये शिकागोच्या डेमोक्रॅटिक राष्ट्रीय अधिवेशनात निदर्शने केल्याच्या आरोपावरून ज्यांच्यावर खटला भरला गेला, त्यात ते एक होते. निक्सन प्रशासनाने त्यांना व इतर सात जणांना दंगलीचा कट रचल्यावरून दोषी ठरवले होते. नंतर किमान २० वर्षे ते कॅलिफोर्निया असेंब्ली व सिनेटमध्ये काम करीत होते.

१९६० ते ६८ या काळातील अमेरिकेतील पिढीने जे चढउतार पाहिले ते कुठल्याच पिढीने पाहिले नाहीत, असे त्यांनी ‘द रीयुनियन’ या पुस्तकात म्हटले आहे. त्यांची इतर १९ पुस्तके आहेत, त्यात काही संपादित आहेत. युद्धविरोधी मोहिमांबरोबरच त्यांनी १९७२ मध्ये इंडो-चायना शांतता मोहीम राबवली होती. १९७२ च्या सुमारास त्यांनी युद्धविरोधी अनेक उपक्रम राबवताना ‘रोड शो’ केले. त्यात अभिनेत्री जेन फोंडा सहभागी होती. नंतर त्यांचा विवाहही झाला. १९७१ मध्ये हेडन यांनी सांता मोनिकाच्या निवडणुकीत सिनेटर जॉन टनी या व्हिएतनाम युद्धसमर्थकाला आव्हान दिले. प्रसारमाध्यमेही विरोधात असताना त्या वेळी त्यांना ४० टक्के मते मिळाली होती. कॅम्पेन फॉर इकॉनॉमिक डेमोक्रसीची स्थापना त्यांनी केली. त्यात अनेक प्रागतिक विचाराचे उमेदवार निवडून आले. १९८२ मध्ये ते सांता मोनिकातून कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीवर निवडून आले. नंतर दहा वर्षांनी सिनेटवर गेले. रिपब्लिकनांनी त्यांना देशद्रोही म्हटले होते. तंबाखूविरोधी चळवळीतही ते अग्रेसर होते.

अमेरिकेतील नवीन राजकीय जीवनाची सुरुवात त्यांना त्यात अपेक्षित होती. समाजशास्त्रज्ञ सी. राइट मिल्स यांचा आदर्श हेडन यांच्यापुढे होता. हेडन यांनी अलीकडेच (२०१५) ‘लिसन यांकी, व्हाय क्युबा मॅटर्स’ हे पुस्तक लिहिले. त्याच्या चार महिने अगोदर अमेरिका-क्युबा संबंध सुरळीत झाले होते. अमेरिकेने क्युबाशी मैत्री करावी असेच हेडन यांचे मत होते. पत्रकार म्हणून त्यांनी मार्टिन ल्यूथर किंग यांची मुलाखत घेतली होती. ‘लेखणी थांबवा व कृती करा,’ असा संदेश त्या वेळी किंग यांनी दिला होता. व्हिएतनामधील युद्ध, त्या देशाचा इतिहास व संस्कृती यांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्यासाठी ते त्या देशात जाऊन आले होते. ते उत्तम संघटक, अ‍ॅथलीट होते. त्यांचे ‘हेल नो- द फर्गाटन पॉवर ऑफ व्हिएतनाम पीस मूव्हमेंट’ हे नवे पुस्तक मात्र आता त्यांच्या मरणोत्तर, येल युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे २०१७ मध्ये प्रकाशित होईल.