18 January 2019

News Flash

टॉमी थॉमस

मलेशियन विकास निधीत नजीब रझाक यांनी केलेले घोटाळे जनतेच्या रोषास कारण ठरले होते

मलेशियातील सत्ताबदलानंतर तेथे अपेक्षेप्रमाणे काही नवीन नियुक्त्या झाल्या असून महाधिवक्तापदी (अ‍ॅटर्नी जनरल) भारतीय वंशाचे बॅरिस्टर टॉमी थॉमस यांची झालेली नेमणूक महत्त्वाची आहे. माजी पंतप्रधान नजीब रझाक व त्यांची पत्नी यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीत ते भूमिका पार पाडणार हे उघडच आहे. नियुक्तीनंतर त्यांनी लगेचच या चौकशीसंदर्भात अमेरिकेसह काही देशांना सहकार्याची विनंती केली आहे.

मलेशियन विकास निधीत नजीब रझाक यांनी केलेले घोटाळे जनतेच्या रोषास कारण ठरले होते त्याचा फायदा घेऊन एके काळचे सहकारी असलेल्या रझाक यांच्याविरोधात महाथीर महंमद यांनी उतारवयातही नेतृत्व करून सत्ता मिळवली. लोकांच्या संपत्तीची होत असलेली लूट पाहवत नाही हे सांगून सत्तेवर आल्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराचा सोक्षमोक्ष लावणे हे त्यांना क्रमप्राप्त होते. त्यामुळे आता मलेशियाचे राजे यांग डी पेरटय़ुअन यांच्या माध्यमातून टॉमी थॉमस यांची नेमणूक करण्यात आली आहे. नजीब यांनी साडेचार अब्ज डॉलर्स या निधीतून वापरले असा आरोप आहे. थॉमस हे मलेशियात गेल्या ५५ वर्षांत महाधिवक्तापदी विराजमान झालेले पहिलेच अल्पसंख्याक. खरे तर मलेशियातील ३१ दशलक्ष लोकांपैकी दोनतृतीयांश लोक हे वांशिक मलय वंशाचे व मुस्लीम आहेत. त्यांनी हे पद मुस्लीम व्यक्तीला देण्याची मागणी केली असताना थॉमस यांची केलेली नेमणूक ही वेगळी आहे, त्यामुळे थॉमस हे धर्म व वंशाच्या आधारावर पक्षपात करणार नाहीत, अशी हमी त्यांची नेमणूक करतानाच दिली आहे. थॉमस हे गेली ४२ वर्षे मलेशियात वकिली व्यवसायात काम करीत आहेत. ते मँचेस्टर विद्यापीठाच्या व्हिक्टोरिया इन्स्टिटय़ूशनचे माजी विद्यार्थी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले. ब्रिटनमध्ये तेथील वकील संघटनेने १९७५ मध्ये त्यांना निमंत्रित केले होते, पण नंतर १९७८ मध्ये त्यांनी मलेशियात वकिली सुरू केली. थॉमस यांनी १९८४-८७ या काळात ‘इन्साफ’ या नियतकालिकेचे संपादन केले होते. एकूण १५० महत्त्वाचे खटले त्यांनी लढवले. बॅरिस्टर असलेले थॉमस हे केवळ वकील म्हणूनच प्रसिद्ध आहेत असे नाही तर समाजशास्त्रज्ञ अशीही त्यांची ओळख आहे. अर्थशास्त्र, राजकारण, इतिहास यात त्यांना तेवढाच रस असून त्यांनी वेगवेगळ्या मंचावर शोधनिबंधही सादर केले आहेत.

First Published on June 14, 2018 2:22 am

Web Title: tommy thomas