सिडनी, २२ मार्च १९९२. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना ऐन रंगात आला होता. १३ चेंडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २२ धावा हव्या होत्या. पण मधेच पावसाचा व्यत्यय आला. काही वेळाने खेळ पुन्हा सुरू झाला, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. जे होते : १ चेंडू २२ धावा! या क्रूर विनोदामुळे काहीजण हळहळले, काही चवताळले. पण हास्यास्पद ठरू शकेल असे लक्ष्यनिर्धारणाचे हे गणिती प्रारूपच बदलायला हवे, या भावनेतून अस्वस्थ झालेल्या मोजक्या व्यक्तींपैकी होते गणितज्ञ टोनी लुइस. १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने), पावसाचा व्यत्यय आलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघापुढे लक्ष्यनिर्धारण करण्यासाठी ज्यांची पद्धती स्वीकारली आणि पाळली, त्या डकवर्थ-लुइस द्वयीपैकी हे एक.

इंग्लंडमध्ये शेफिल्ड महाविद्यालयात गणित आणि संख्याशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर लुइस काही काळ ब्रिस्टॉल येथील वेस्ट इंग्लंड कॉलेजमध्ये व्याख्याता होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांत पावसाचा व्यत्यय आल्यानंतर (इंग्लंडमध्ये हे प्रकार नेहमीचेच) सामना कमी षटकांचा खेळवायचा झाल्यास, विशेषत: दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी नेमके लक्ष्य कसे निर्धारित करायचे, हा प्रश्न क्रिकेट प्रशासक आणि संघटकांना अनेक वर्षे सतावत होता. फ्रँक डकवर्थ यांनी यासंबंधी काही गणिती प्रारूपे ऐंशीच्या दशकात बनवली होती, जी अत्यंत गुंतागुंतीची होती. १९९२ मधील त्या हास्यास्पद प्रकारानंतर डकवर्थ यांनी रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीसमोर एक प्रबंध सादर केला, जो लुइस यांच्या वाचनात आला. मग पावसाचा व्यत्यय आलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांना अधिक समन्यायी बनवण्यासाठी काही वर्षे झटून त्यांनी जी पद्धत विकसित केली, तीच ही ‘डकवर्थ-लुइस मेथड’! यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून किती धावा झाल्या याबरोबरच त्या संघाने किती गडी राखले हेही विचारात घेतले जाते. अजूनही बहुतेकांना यातील गणिती आकडेमोड आकळत नाही, पण या पद्धतीला (जी आता डकवर्थ-लुइस-स्टर्न अर्थात डीएलएस म्हणून संबोधली जाते) जगन्मान्यता मात्र मिळाली.

अध्यापन कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात लुइस हे ऑक्सफर्ड ब्रुक महाविद्यालयात संख्यात्मक संशोधन पद्धती शिकवत. ‘खेळातले गणित’ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यावर इंग्लंड व ऑस्ट्रेलियात त्यांनी व्याख्यानेही दिली होती. काही दिवसांपूर्वी लुइस यांचे निधन झाले. ते स्वत: कधी क्रिकेट खेळले नाहीत, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटला समन्यायी बनवण्यातील त्यांचे योगदान, त्यांच्या पश्चातही विस्मृतीत जाणार नाही.