ज्येष्ठ कवी तुळशीराम माधवराव काजे यांचे पोळ्याच्या दिवशी निधन झाले. दोन वर्षांपूर्वी वऱ्हाडी भाषेची श्रीमंती देशभर पसरवणारे कवी शंकर बडे याच दिवशी निवर्तले. हा एक योगायोग, पण  विदर्भावर, इथल्या मातीवर प्रेम करणाऱ्या या दोन्ही प्रतिभावान कवींचे कृषी संस्कृतीवरील प्रेम बावनकशी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळशीराम काजे यांची प्रेमजाणिवा आणि निसर्गानुभूती व्यक्त करू पाहणारी सुरुवातीची कविता नंतरच्या काळात समाजजीवनातील विसंगती, दांभिक व्यक्तिजीवन, शोषणव्यवस्था व सामान्य माणसाची परवड इत्यादी अंगांनी अभिव्यक्त होत गेली. काजे यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील पुसनेर. त्यांचे बालपण याच खेडेगावात मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात गेले. तेथे तिसरीनंतर शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे चौथीच्या शाळेसाठी त्यांना गावापासून दोन मैल अंतरावर असणाऱ्या नांदसावंगी येथे पायी जावे लागत असे. पुढील शिक्षणासाठी त्यांना अमरावतीला यावे लागले. एम.ए., बी.एड. झालेल्या तुळशीराम काजे यांनी १९६० मध्ये शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्याआधीपासून ते काव्यलेखन करीत होते. ‘नभ अंकुरले’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९५८ साली प्रकाशित झाला होता. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे, रक्त शोषू द्यावे शांतपणे, अधम सत्तेचे पाऊल चाटावे, चित्ती असो द्यावे समाधान!’, अशा ओळींनी वास्तवावर भाष्य करणारे काजे यांचा मौज प्रकाशनने १९८३ साली प्रकाशित केलेला ‘भ्रमिष्टांचे शोकगीत’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रचंड गाजला. महाराष्ट्र शासनाच्या केशवसुत पुरस्काराने त्यांना त्यासाठी सन्मानित करण्यात आले होते. ‘काहूर भरवी’ हा त्यांचा तिसरा काव्यसंग्रह. ‘धारा’ या त्रमासिकाचे संपादनही त्यांनी केले होते. वरुड तालुक्यातील लोणी येथील रामप्यारीबाई चांडक विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा देऊन ते १९९२ मध्ये निवृत्त झाले. अमरावती विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे तज्ज्ञ सदस्यपद, वरुड येथे २००२ मध्ये झालेल्या सातव्या मराठी जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.  वर्षभरापूर्वी त्यांना सूर्यकांतादेवी पोटे स्मृती साहित्यव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तुळशीराम काजे हे संकोची स्वभावाचे. फारसे गर्दीत मिसळणारे नव्हते. पण, त्यांच्या कवितांमधून समाजजीवनातील दांभिकपणा, विसंगती यावर कठोर प्रहार होत गेले. त्यांची कविता ही मातीशी नाळ जोडणारी होती. मानवी प्रवाही जीवनात निव्र्याजपणे जगण्याचे मोल त्यांच्या कवितेतून व्यक्त होत राहिले. त्यांच्या कवितांमधून आत्मभान आणि समाजभान यांचा सुरेख मेळ साधला गेला, म्हणून त्यांच्या कविता रसिकांच्या मनाला भिडल्या.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulshiram kaje
First published on: 14-09-2018 at 02:01 IST