अन्न सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. जगभरात करोनासारख्या साथींनी आर्थिक समस्या आणि विषमता वाढत असल्याने भूकबळींची संख्याही वाढू शकते. अर्थात भूकबळी पडल्याचे कुठलेही सरकार सहजासहजी मान्य करीत नाही. या परिस्थितीत अन्न सुरक्षेच्या शाश्वत प्रणाली शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी एक समिती नेमली; त्यात दोन मूळ भारतीयांच्या नेमणुका झाल्या आहेत. एक म्हणजे, अलीकडेच जागतिक अन्न पारितोषिक मिळाले ते रतनलाल (त्यांच्याविषयी याच स्तंभात, २५ जून रोजी अनेकांनी वाचले असेल), तर आणखी एक नेमणूक झाली त्यांचे नाव  उमा लेले.

विकास अर्थशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. लेले यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात संशोधन केले आहे. त्यांची इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट्स या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड याआधीच झाली आहे. धोरण विश्लेषक म्हणून जागतिक बँक, अनेक अमेरिकी/ युरोपीय विद्यापीठे व आंतरराष्ट्रीय संस्थांत काम करण्याचा पाच दशकांचा अनुभव त्यांना आहे.

लेले यांचा जन्म साताऱ्यातील कोरेगावचा. पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयातून त्या १९६० मध्ये बीए झाल्या. नंतर त्यांनी अमेरिकेची वाट धरली. तेथे त्या १९६३ मध्ये एमएस म्हणजे मास्टर ऑफ सायन्स झाल्या. कृषी अर्थशास्त्र विषयात कॉर्नेल विद्यापीठातून १९६५ मध्ये विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी घेतली. याच विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापक आहेत.

दिल्लीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या संस्थेच्या त्या सल्लागार आहेत. दिल्लीत २०२१ मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट्स’ ही परिषद होणार आहे, त्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.  जागतिक जलभागीदारी गट, जागतिक बँकेचा कार्यप्रणाली मूल्यमापन विभाग (ऑपरेशन इव्हॅल्युएशन डिपार्टमेंट) यांसारख्या अनेक संस्थांच्या सल्लागारपदी त्यांनी काम केले आहे.

त्यांना २०१६-१७ मध्ये एम. एस. स्वामिनाथन पुरस्कार , २०१८ मध्ये क्लिफ्टन व्हॉर्टन पुरस्कार ,स्टेलनबाख़ विद्यापीठाची डॉक्टरेट असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत. अनेक संस्थांच्या त्या मानद सदस्यही आहेत.

कृषी उत्पादकता वाढ व  रचनात्मक स्थित्यंतरे, विकासात वन व पाणी यांच्या बदलत्या भूमिका यावर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.

‘मॅनेजिंग ग्लोबल रिसोर्स-चॅलेंजेस ऑफ फॉरेस्ट कॉन्झव्‍‌र्हेशन अँड डेव्हलपमेंट’, ‘फूड ग्रेन मार्केटिंग इन इंडिया- प्रायव्हेट परफॉर्मन्स अँड पब्लिक पॉलिसी’, ‘डिझाइन ऑफ रुरल डेव्हलपमेंट- लेसन्स फ्रॉम आफ्रिका’, ‘ट्रान्सिशन इन डेव्हलपमेंट- फ्रॉम एड टू कॅपिटल फ्लोज’, ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स इन अ‍ॅग्रिकल्चर- दी वर्ल्ड बँक्स रोल इन असिस्टिंग बॉरोअर अँड  मेंबर कंट्रीज’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

सध्या त्या ‘फूड फॉर ऑल- इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चर’ हे पुस्तक लिहीत आहेत.