‘शब्दांइतकेच, किंबहुना शब्दांपेक्षाही मौन अधिक बोलके असते, ते खूप काही सांगू पाहते, सांगते’ अशी ज्यांची ठाम धारणा होती आणि ज्या धारणेशी जे आयुष्यभर प्रामाणिक राहिले ते श्रेष्ठ उर्दू लेखक नैयर मसूद निवर्तले. गेल्या सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांत तर सोडाच, समाजमाध्यमांवरही फारशी नव्हती. अर्थात ‘लाइक्स’ वा ‘कमेंट’ मिळवणारे लेखक ते नव्हतेच.

नैयर मसूद यांचा जन्म सन १९३६चा. जन्मस्थळ लखनौ. बालपण तिथेच, शिक्षण तिथेच आणि पुढील कारकीर्दही त्याच लखनौमध्ये. नैयर मसूद यांचे वडील सईद मसूद हसन रिझवी हे लखनौ विद्यापीठात पर्शियन भाषा शिकवायचे. नैयर हेदेखील वडिलांच्याच वाटेवरील वाटसरू. त्यांनीदेखील लखनौ विद्यापीठात पर्शियन भाषेचे अध्यापन दीर्घकाळ केले. या भाषेच्या विभागाचे ते प्रमुखही होते. प्राध्यापक म्हणून नैयर मसूद यांची कारकीर्द मोठीच, पण त्याहीपेक्षा मोठी होती ती त्यांची लेखक म्हणून असलेली ओळख. ‘गंजिफा’, ‘ताऊस चमन की मैना’, ‘इत्र ए कांफूर’ आदींसाठी नैयर ओळखले जातात. ३५ कादंबऱ्या व अनेक लघुकथा त्यांच्या नावावर आहेत. मात्र नैयर यांच्या लेखनातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रान्झ काफ्काच्या कथा उर्दू भाषेत आणण्याचे त्यांनी केलेले मोठे काम.

उर्दू साहित्याची एकंदर धाटणी ही रोमँटिक शायरी किंवा मग गूढवादी किंवा मग ‘तरक्कीपसंद’ अशा ध्रुवांभोवती फिरणारी. काफ्काचा अस्तित्ववाद वा तत्सम प्रकारचे लिखाण उर्दूत तसे कमीच. जागतिक साहित्यात खूपच मोठे स्थान असलेल्या काफ्काच्या कथा उर्दू भाषेत अनुवादित करण्याचे मोलाचे काम मसूद यांनी केले. काफ्काच्या कथा उर्दूत आणणारे नैयर हे एकमेव लेखक. काफ्का उर्दूत आणल्याने नैयर यांचे स्थान उंच झालेच, पण त्याचसोबत उर्दू वाचकांनाही जागतिक साहित्यातील एक मोठे दालन खुले झाले. नैयर निवर्तल्यानंतर ‘काफ्का उर्दूत आणणारा लेखक गेला,’ असे त्यांच्या मृत्युवार्तेचे मथळे होते. त्यावरून या अनुवादाचे महत्त्व लक्षात यावे. त्यांच्या लिखाणाची रीत वेगळीच होती. आधी १०० पानांमध्ये कथा लिहायची. मग ती तासत तासत न्यायची. कमी कमी करीत ती २० पानांवर आणायची, ही त्यांची पद्धत. या २० पानांमधून ते जे मांडायचे ते खूप प्रभावी असे असायचे.

त्यांच्या लिखाणात सामाजिक व राजकीय विषय सर्रास दिसतात. त्यावर भाष्य दिसते. मात्र त्यांचे लिखाण त्या अर्थाने सुलभ, सोपे नाही. वास्तव, स्वप्न, गूढता यांचे अजब मिश्रण त्या लिखाणात आढळते. काफ्काशी त्यांना आंतरिक जवळीक वाटत असणार. त्याखेरीज नैयर यांनी त्याच्या कथा उर्दूत आणल्या नसत्या. हीच आंतरिक जवळीक त्यांच्या लिखाणातही प्रतिबिंबित झाली असावी कदाचित. मात्र काहीही झाले तरी वास्तवाचा हात त्यांनी लिखाणात सोडला नाही. कुठल्याही राजकीय इझमचा झेंडा खांद्यावर न घेता त्यांनी कायम वास्तवाचा धांडोळा घेण्याचा, ते समजून घेण्याचा, ते मांडण्याचा श्रम केला.

‘आजचे लेखक वास्तवाची पार वासलात लावून टाकतात,’ हे त्यांचे म्हणणे होते. पद्मश्री, साहित्य अकादमी, सरस्वती सम्मान यांनी नैयर यांच्या साहित्याचा गौरव झाला. ‘लिहिणे म्हणजे शांत राहणे, शिकत जाणे,’ अशी मसूद यांची लेखनविषयक भूमिका होती. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहात, फारसा गलबला न होताच ते त्या अंतिम शांततेत विलीन झाले.