News Flash

उषा  मा. देशमुख

संत साहित्य हा मराठी साहित्याला लाभलेला अनमोल ठेवा आहे.

संत साहित्य हा मराठी साहित्याला लाभलेला अनमोल ठेवा आहे. आपल्या लेखनातून त्याची अलवार उकल करून दाखवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. उषा मा. देशमुख यांना राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा योग्य गौरव केला आहे.

मुंबई विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या उषाताई मूळच्या खानदेशातील अमळनेरच्या. १९५२ ला त्यांचा विवाह प्रसिद्ध समीक्षक-नाटककार प्रा. मा. गो. देशमुख यांच्याशी झाला. उमरखेडला प्राध्यापक असलेले देशमुख मुलींच्या शिक्षणाविषयी कमालीचे दक्ष होते. त्यांनी केवळ  मॅट्रिक असलेल्या पत्नीला उच्चशिक्षण घ्यायला लावले. नंतरची दहा वष्रे रौप्यपदके मिळवत पीएच.डी. केलेल्या उषाताई नंतर प्राध्यापक म्हणून स्थिरावल्या. मा. गो. देशमुख मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर उषाताईसुद्धा मुंबईत आल्या. विशेष म्हणजे, या दोघांनीही या विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुखपद भूषवले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात ज्ञानदानाचे कार्य करत असतानाही त्यांनी मानवतावादी मूल्यांचा अवलंब करत विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जडणघडण केली. प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास आणि साहित्य संशोधन व साहित्य समीक्षा हे त्यांच्या अभ्यासाचे क्षेत्र राहिले. आधुनिक मराठी कवितेचा अभ्यास हाही त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे.

उषाताईंनी प्राचीन व अर्वाचीन वाङ्मय, संत साहित्य, संशोधन व समीक्षा, असे सर्व प्रकार लेखनात हाताळले आहेत. संतसाहित्यावरची त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. संतांची लोकशिक्षणविषयक भूमिका, त्यांचा भक्तीविषयक दृष्टिकोन, संतांची शिकवण या सर्व गोष्टींची उकल त्यांनी त्यांच्या साहित्यातून केली आहे. सुमारे ४० वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात रमलेल्या उषाताईंची ‘कुसुमाग्रज साहित्यदर्शन’, ‘ज्ञानेश्वरी एक शोध’, ‘दीपमाळ’ व ‘रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव’ ही काही गाजलेली पुस्तके आहेत. याशिवाय, त्यांनी ‘वाङ्मयीन व्यक्ती’, ‘साहित्यतोलन’, ‘ज्ञानेश्वरी जागरण’, ‘दलित साहित्य स्थिती गती’, ‘मराठी नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास’ यासह अनेक पुस्तकांचे संपादनही केले आहे. अध्यापनाच्या क्षेत्रात निष्ठेने काम करतानाच साहित्यक्षेत्रातील विविध संस्थांशी त्यांचा संबंध राहिला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या पुसदला झालेल्या संमेलनाचे, तसेच वैदर्भीय लेखिका संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. याशिवाय, जगभरात ठिकठिकाणी झालेल्या जागतिक मराठी साहित्य परिषदेत त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

केवळ राज्यातीलच नाही, तर शेजारच्या राज्यातील मराठी अभ्यास मंडळांशी त्यांचा घनिष्ठ संबंध राहिला आहे. बडोदा विद्यापीठात त्यांनी मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून काम केले आहे. निवृत्तीनंतरही त्या विविध साहित्य व सांस्कृतिक व्यासपीठावर तेवढय़ाच जोमाने सक्रिय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:31 am

Web Title: usha deshmukh
Next Stories
1 लेफ्ट. जन. एस के सिन्हा
2 प्रा. राज बिसारिया
3 डॉ. राजीव वाष्र्णेयु
Just Now!
X