‘उषा गांगुली यांची नाटय़संस्था’ म्हणून ओळखली जाणारी कोलकात्यातील ‘रंगकर्मी’ ही संस्था म्हणजे बंगालात हिंदी नाटके सादर करणारी संस्था नव्हती. तरुण कलावंतांना नाटय़ासोबत नृत्य-संगीत आणि अवकाश यांचेही भान देणारे ते अनौपचारिक विद्यापीठ होते, हिंदी भाषेच्या शक्यता अजमावणारे एक ऊर्जाकेंद्र होते आणि देशभरच्या नव्या, प्रयोगशील नाटय़कर्मीना जोडण्याचा प्रयत्न करणारे एक मोहोळ होते! नेमकी हीच सारी वैशिष्टय़े उषादीदी ऊर्फ उषा गांगुली यांच्या व्यक्तित्वातही होती. पंच्याहत्तरीचा सोहळा साजरा न होताच, २३ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले.

उत्तर प्रदेशातील आणि स्वत:ला उच्चकुलीन समजणाऱ्या कुटुंबातल्या उषादीदींचा जन्म वडील बँकेत असल्यामुळे जोधपूरला झाला आणि वडिलांची बदली झाल्यानेच बालपणापासून त्या कोलकात्यात आल्या. घरच्या अवधी भाषेसोबत दारची बांग्ला भाषा आपोआप अवगत झाली. हिंदी साहित्यात पदव्युत्तर पदवीनंतर कोलकात्याच्याच भवानीपूर कॉलेजात त्या हिंदी शिकवत. ही नोकरी त्यांनी ३७ वर्षे- अगदी २००६ सालापर्यंत केली. नाटक वगैरे आपले काम नव्हे, असे ‘संस्कार’(!) झालेल्या उषादीदींच्या आईला गाणे- नृत्य यांची आवड होती. मुलीने कथकसारखे शास्त्रीय नृत्य शिकावे, ही आईची इच्छा असल्याने उषादीदींना आठव्या वर्षीपासून रीतसर नृत्यशिक्षण मिळाले. मात्र नाटकात पहिल्यांदा काम केले ते १९७० साली! हे नाटक ‘वसंतसेना’. रंगमंचाचा अवकाश त्यांना इतका भावला की, ताज्या विषयांवर नाटके हवीत, यासारख्या वादानंतर त्यांनी ‘संगीत कला मंदिर’ ही नाटय़संस्था सोडून १९७६ साली ‘रंगकर्मी’ स्थापली. स्त्रीविषयक नाटके करू, असे ठरवून एम. के. रैनांसारखे दिग्दर्शक आणि तृप्ती मित्रांसारख्या दिग्दर्शिकांना पाचारण केले. अनेक दिग्दर्शकांची पद्धत पाहातानाच, १९८४ मध्ये ‘महाभोज’ हे नाटक त्यांनी स्वत: दिग्दर्शित केले आणि मग, अभिनेत्रीपेक्षा दिग्दर्शिका हीच त्यांची कीर्ती ठरली. अल्पसंख्याक स्त्रिया, नशामुक्ती केंद्रातले तरुण यांसारख्या ‘नाटय़ेतर’ समूहांतील व्यक्तींसह नाटक सादर करणे, पथनाटय़ेही करणे यांतून त्यांच्या संघटनकौशल्याचे समाजभान दिसले. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना १९९८ सालीच मिळाला होता.. देह थकण्याआधीच त्या गेल्याने, भारतीय रंगभूमीबद्दलचे त्यांचे चिंतन अलिखितच राहिले.