28 February 2021

News Flash

उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ

गुलाम मुस्तफा खाँ यांच्या निधनाने एका अतिशय तरल आणि स्वरसंपन्न कलावंताला आपण मुकलो आहोत

‘उस्ताद’ म्हणवण्याचा मान सर्वानाच मिळतो असे नाही. परंतु आपल्या गायन कौशल्याने व अभिजात संगीतातील कर्तृत्वाने गुलाम मुस्तफा खाँ यांना ते नेहमीच शोभून दिसले. गायनातील त्यांच्या कारकीर्दीपेक्षा त्यांच्या शिष्यगणांचीच चर्चा जेव्हा अधिक होते, तेव्हा त्यांच्या कलावंत म्हणून असलेल्या प्रतिमेवर अन्याय होण्याचीच शक्यता अधिक असते. रामपूर सहस्वान घराण्याचे गायक म्हणून ते नावारूपाला आले आणि त्या घराण्याच्या शैलीत त्यांनी स्वत:चा विचारही व्यक्त केला, त्यामुळे हे घराणे सतत टवटवीत राहिले. आजच्या काळातील प्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खाँ हे त्यांचे पुतणे. उत्तर प्रदेशातील बदायून हे त्यांचे जन्मगाव. बोलू लागण्याच्या आधीपासून स्वरसाधना करणाऱ्या गुलाम मुस्तफा खाँ यांची सांगीतिक कारकीर्द अनेक दशकांची. तीही अतिशय देदीप्यमान. तिन्ही पद्म पुरस्कार, शिवाय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार हे त्याचे दृश्य स्वरूप. अभिजात संगीताच्या क्षेत्रात ‘मैफली गवय्ये’ म्हणून नावारूपाला येत असतानाच, कलांच्या इतर क्षेत्रांमध्ये सुरू असलेली चहलपहल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, त्यामुळे चित्रपटांसाठी पार्श्वगायन, संगीतकार यांसारख्या गोष्टींतही त्यांनी मनापासून रस घेतला. गायनातील तरलता, श्रुतींवरील हुकमत व स्वरांचा लगाव यांमुळे त्यांचे गायन श्रुतिमनोहर असे. ख्यालाबरोबरच ठुमरी, दादरा, गझल यांसारख्या ललित संगीतातही त्यांचा विहार अतिशय रंजक व लोकप्रिय ठरला. पुतणे राशीद खाँ यांच्याबरोबरच लता मंगेशकर, आशा भोसले, कमल बारोट, हरिहरन, सोनू निगम यांच्यासारख्या लोकप्रिय कलावंतांना खाँसाहेबांनी मनापासून शिक्षण दिले. ‘‘गायक म्हणून येणाऱ्या अडचणी शोधणे आणि त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणे, एवढेच मी करत आलो,’’ असे सांगणाऱ्या या कलावंताची खरी ओढ मात्र ख्याल गायनाचीच होती. रागसंगीताच्या स्वरसागरात डुंबत राहणे व त्यातून नवनवीन कलाकृतींची निर्मिती करणे हे प्रत्येक कलाकारासाठी नेहमीच आव्हान असते. ते त्यांनी स्वीकारले; त्यामुळेच त्यांचे गायन सामान्य रसिक आणि कलावंत अशा दोघांच्याही पसंतीस उतरले. कठोर मेहनत व रसिकांचे आशीर्वाद हे आपल्या यशाचे गमक, असे सांगण्याची पद्धत असते. परंतु केवळ मेहनतीने कला रसिकांच्या पसंतीला उतरतेच असे नाही, त्यासाठी नवसर्जनाची आराधना करावी लागते, हे खाँसाहेबांनी बरोबर ओळखले. त्यामुळे सर्वच संगीत प्रकारांच्या अभिव्यक्तीमधील आपले वेगळेपण जपत त्यांनी आयुष्यभर स्वरांची सेवा केली. आयुष्यातील बराच काळ मुंबईत व्यतीत करणाऱ्या गुलाम मुस्तफा खाँ यांच्या निधनाने एका अतिशय तरल आणि स्वरसंपन्न कलावंताला आपण मुकलो आहोत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 1:02 am

Web Title: ustad ghulam mustafa khan profile zws 70
Next Stories
1 डॉ. जुल्फी शेख
2 अलेक्सांद्रे नज्जर
3 वेद मेहता
Just Now!
X