पुरातत्त्व विद्या आणि पत्रकारिता याचे मिश्रण ज्या व्यक्तिमत्त्वात सामावले आहे, ते नाव म्हणजे डॉ. वि. ल. धारुरकर. त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची झालेली निवड मराठवाडय़ासाठी भूषणावह. बातमी लिहिण्यापासून ते इतिहासातील अनेक पुरावे शोधून त्यावर संशोधन करणाऱ्या धारुरकरांनी मराठवाडय़ातील पत्रकारांना इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा हे मूळ गाव असणाऱ्या धारुरकरांनी शालेय शिक्षणात कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांत शिकताना त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. पदवी परीक्षेत पहिला क्रमांक मिळविल्यानंतर रात्रपाळीचे उपसंपादक म्हणून त्यांनी दैनिकात काम केले. मजकुराचे भाषांतर करत वृत्तपत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या धारुरकर यांना इतिहासाची आवड काही स्वस्थ बसू देईना. इतिहासाच्या पुरातत्त्व शाखेत प्रावीण्य मिळवत त्यांनी वेरुळ लेण्यातील जैन शिल्पांचा अभ्यास केला. याच विषयात त्यांची पीएच.डी.देखील आहे. सर्वसाधारणपणे प्रबंध लिहिले की प्राध्यापक मंडळी ते विसरून जातात. मात्र आजही धारुरकरांना त्यांच्या प्रबंधातील ओळीच्या ओळी पाठ आहेत. १९७५ मध्ये नाशिक महाविद्यालयात इतिहास विषय शिकविणाऱ्या ‘वि. लं.’ची कुसुमाग्रजांशी भेट होत असे. तसेच वसंत कानेटकर यांनाही नाटक लिहिण्यासाठी लागणारे ऐतिहासिक संदर्भही वि.लं.नी शोधून दिले होते. ‘सिंधू संस्कृतीतील कलेचा उत्कट आविष्कार’ या विषयीही त्यांनी संशोधन केले. याच संशोधनासाठी गावोगावी फिरताना त्यांनी अहिराणी भाषा शिकून घेतली.  नाशिक जिल्ह्य़ात एक वर्ष, तुळजापूर येथे एक वर्ष नोकरी करण्यापूर्वी त्यांनी पुरातत्त्व विभागातही काम केले होते.  इतिहासाच्या प्रांतात रमणारा हा माणूस तसा मूळ पत्रकार. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली. पत्रकारितेवरील त्यांची वेगवेगळी ३६  पुस्तके प्रकाशित आहेत. ‘सावरकरांची पत्रकारिता’ हे त्यांचे पुस्तकही बरेच गाजले. विचारांशी बांधिलकी जपत इतिहास आणि वर्तमानाचा दुवा म्हणून त्यांनी केलेले काम लक्षणीय मानले जाते.

शिवाजी विद्यापीठात असताना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येऊन शिकवावे, अशी त्यांना विनंती करण्यात आली. सोलापूरचे ज्येष्ठ संपादक रंगाअण्णा वैद्य यांच्या पारखी नजरेतून त्यांची पत्रकारिता बहरली. इतिहास आणि वर्तमान याचा साकव बनत धारुरकर यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेख लिहिले. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या सर्व विषयांचा आवाका असणाऱ्या धारुरकर यांनी वेगवेगळ्या देशांत त्यांची संशोधने सादर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १९८३ ते २०१६ पर्यंत पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. याच विद्यापीठात ‘लिबरल आर्ट्स’ या विषयाचा अभ्यासक्रम आखण्यात त्यांचे मोठे योगदान होते. इतिहास आणि पत्रकारिता अध्यापनातून वर्तमानाशी सांगड घालणाऱ्या धारुरकर यांची त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.