कर्करोगाचे निदान, काळजी व उपचार यात बरीच प्रगती झाली; पण कर्करुग्णांना अनेकदा मानसिक हिंमत देण्याची गरज असते, ती देण्याचे काम कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर असलेल्या व्ही. शांता यांनी अतिशय व्रतस्थपणे केले. गेली ६५ वर्षे त्यांनी कर्करोग रुग्णांसाठी आयुष्य वाहिले होते. चेन्नईजवळ कर्करुग्णांसाठी अडय़ार येथील संस्थेत त्यांनी काम केले.  त्यांच्या निधनाने कर्करुग्णांचा मोठा आधार गेला. त्यांना मॅगसेसे, पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण यांसारख्या अनेक पुरस्कार-किताबांनी गौरवण्यात आले असले, तरी त्यांची नम्रता व संवेदनशीलता त्यांच्या चमकत्या डोळ्यांतून उजळत असे.  त्यांच्यासमोर रुग्ण आल्यानंतर त्याची भीती पळून जात असे. त्यांच्यात जी ऊर्जा होती ती पाहून रुग्णांच्या जीवात जीव येत असे, रुग्णांना प्रेरणा मिळत असे. रुग्ण समुपदेशनासाठी एक गटही त्यांनी स्थापन केला होता. शांता यांना रुग्णांचे प्रेम लाभले, ते त्यांनी दुपटीने परतही केले. काही वेळा रक्ताचा कर्करोग असलेल्या रुग्णांशी त्या दिवसभर बोलत राहायच्या. पाठकोऱ्या कागदावर भाषणाच्या नोंदी काढून, कागदाचा वापर जपून करावा हा संदेश नकळत त्या देत असत.

१९५५ मध्ये तत्कालीन मद्रासच्या कर्करोग संस्थेत निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. शांता रुजू झाल्या. त्या वेळी त्या एमबीबीएस झालेल्या होत्या. स्त्रीरोगशास्त्रात त्या काळात त्या एमडी होत्या. मद्रास लोकसेवा आयोगाच्या महिला व बाल रुग्णालयात त्यांना सहायक शल्य चिकित्सक म्हणून पद दिले जात असतानाही त्यांनी अडय़ार येथे मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या पुढाकाराने १९५४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या कर्करोग संस्थेत काम करण्याचे ठरवले. कर्करोग क्षेत्रात वैज्ञानिक, डॉक्टर्स घडवण्याचे काम त्यांनी केले. अडय़ार येथील ही संस्था उभारण्यात त्यांचाही वाटा होता. वैद्यक क्षेत्रात भारतामध्ये कर्करोगशास्त्र या नवीन शाखेला मान्यता त्यांच्यामुळे मिळाली. त्यानंतर १९८४ मध्ये अडय़ार येथील संस्थेत कर्करोगावर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेत त्या २००५ मध्ये कर्करोगाच्या सल्लागार होत्या. राज्याच्या कर्करोग सल्लागार मंडळावरही त्यांनी काम केले तसेच भारतीय वैद्यक संशोधन परिषदेतही त्यांनी सल्लागारपद सांभाळले. तामिळनाडूतील कर्करोग नोंदणी अहवालाच्या कामात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने कर्करुग्णांची मायेची सावली अंतरली आहे.