18 October 2019

News Flash

वसंत नरहर फेणे

काळ आणि मानवी समाज यांच्यातील नात्याचे बंध उलगडणे हे कथात्म साहित्याचे एक वैशिष्टय़ मानले जाते.

वसंत नरहर फेणे

काळ आणि मानवी समाज यांच्यातील नात्याचे बंध उलगडणे हे कथात्म साहित्याचे एक वैशिष्टय़ मानले जाते. मराठी कथात्म साहित्यात हे वैशिष्टय़ ठळकपणे ज्यांच्या साहित्यात आढळते अशांमध्ये वसंत नरहर फेणे हे प्रमुख नाव. साठोत्तरी काळात लिहिते झालेल्या फेणे यांनी गेली सुमारे पाच दशके सकस कथा-कादंबऱ्यांनी मराठी कथात्म साहित्य समृद्ध केले. फेणे यांचा जन्म मुंबईतील जोगेश्वरीचा. ते चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे कुटुंब कारवारला वास्तव्यास गेले. त्यानंतर वर्षभर सातारा, मग पुन्हा कारवारी वास्तव्य आणि पुढे काही वर्षांनी मुंबईत परतल्यावर त्यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची एक कविता- ‘भारत माझा स्वतंत्र झाला!’- ‘सत्यकथा’मध्ये (ऑगस्ट, १९४७) प्रकाशित झाली होती. पुढल्या कविता ‘सत्यकथे’ने नाकारल्यावर विशीतच काव्यलेखनाला कायमचा विराम मिळाला. याच काळात राष्ट्र सेवा दलाशीही ते जोडले गेले. या पाश्र्वभूमीमुळेच कदाचित, १९६१ मध्ये लोकशाही समाजवादाचा आग्रह धरणारा अमेरिकी विचारवंत सिडने हुक याच्या ‘स्टडीज इन कम्युनिझम’ या पुस्तकाचा ‘साम्यवाद- एक अभ्यास’ हा अनुवाद फेणे यांनी केला होता.

याच काळात, वयाच्या  पस्तिशीत ते कथात्म साहित्याकडे वळले. दिवाळी अंकांतून त्यांच्या लेखनाने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. १९७२ मध्ये त्यांचा ‘काना आणि मात्रा’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्याला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. दरम्यान, एस.टी., हाऊसिंग बोर्डमधील कामानिमित्ताने ठाणे, पुणे, कोल्हापूर, विजापूर, नाशिक अशा ठिकाणी त्यांना वास्तव्य करावे लागले. या स्थलांतराचा आणि तिथल्या अनुभववैविध्याचा प्रभावही त्यांच्या साहित्यावर दिसून येतो. पुढे १९७८ मध्ये वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ लेखन-वाचनाला वाहून घेतले. वयाच्या नव्वदीपर्यंत ते लिहिते राहिले. तब्बल साडेपाच दशकभरांच्या काळात सुमारे साठ कथा व दहा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यात ‘ज्याचा त्याचा क्रूस’, ‘निर्वासित नाती’, ‘पाणसावल्यांची वसाहत’, ‘मावळतीचे मृद्गंध’ हे कथासंग्रह आणि ‘सेन्ट्रल बस स्टेशन’, ‘विश्वंभरे बोलविले’ या दोन कादंबऱ्या,  नुकतीच प्रसिद्ध झालेली ‘कारवारी माती’ ही बृहत्कादंबरी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. प्रत्ययकारी भाषाशैली, सूक्ष्म निरीक्षण, राजकीय-सामाजिक प्रक्रियांची नेमकी उमज, देशी-परदेशी भूमीवर घडणारी कथानके, मानवी नातेसंबंध आणि एकूणच भवतालाबद्दलचे विलक्षण कुतूहल या गुणवैशिष्टय़ांचा मिलाफ असलेला कथात्म साहित्यिक फेणे यांच्या निधनाने आपण गमावला आहे.

First Published on March 7, 2018 2:02 am

Web Title: vasant narhar phene