महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नाटक हा विषय नेहमीच प्राधान्यक्रमाचा राहिला. त्यामुळे मराठीतील प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या चळवळी समाजजीवनातील मोठा भाग व्यापणाऱ्या राहिल्या. या कलेचा केवळ ध्यास घेतलेले डॉ. वि. भा. देशपांडे हे व्यक्तिमत्त्व होते. नाटक या विषयाशिवाय त्यांनी फारसे लेखनच केले नाही. आपली दृष्टी सतत एकाच कलेभोवती फिरवत ठेवून त्यातील बारीकसारीक तपशिलाचे अध्ययन करीत राहणे हा त्यांचा आवडता विषय होता. त्यामुळेच केवळ नाटय़विषयाशी संबंधित २४ पुस्तके त्यांच्या हातून लिहून झाली. विष्णुदास भावे यांच्यापासून ते तेंडुलकरांपर्यंतच्या नाटककारांच्या संहितांचा अभ्यास करून त्यांनी तीन खंडांचे ग्रंथ लिहिले. एवढेच नव्हे, तर मराठी नाटय़कोश हा बाराशे पृष्ठांचा ऐवजही तयार केला.

कोणत्याही नाटकाच्या पहिल्या प्रयोगास हमखास उपस्थिती लावणारे वि. भा. सार्वजनिक सभासमारंभात हमखास दिसत. नाटय़क्षेत्रात सातत्याने ऊठबस करणाऱ्या विभांना माणसे जमवण्याची आणि मैत्री करण्याचीही आवड होती. महाराष्ट्रातील वृत्तपत्रीय जगतात दीर्घकाळ सातत्याने नाटय़विषयक लेखन करणारे त्यांच्यासारखे अन्य लेखक विरळा! कर्नाटकातील यक्षगान हा त्यांच्या पीएच.डी.च्या संशोधनाचा विषय. त्यातून त्यांना नाटक या विषयाच्या अभ्यासाची गोडी लागली आणि बहुविध सर्जकांच्या एकत्रित येण्याने घडणाऱ्या या अनोख्या कलेकडे समीक्षकी नजरेने न्याहाळण्यास त्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांत नाटक या विषयाशी संबंधित शेकडो लेख त्यांनी लिहिले. त्यातील काही लेखांचे संकलन पुस्तकरूपानेही प्रसिद्ध झाले. स्वतंत्र लेखनाबरोबरच सुमारे २२ ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. त्यामध्येही प्रामुख्याने नाटक हाच विषय केंद्रस्थानी राहिला. सातत्याने लेखन करण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा त्यांच्यामध्ये होती. गेली सुमारे ४५ वर्षे विभा सतत काही तरी लिहीत असत. त्यामुळे त्यांच्या हातून एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण होऊ शकली. परिणामी, अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले. ‘वारसा रंगभूमीचा’, ‘नाटकातली माणसं’, ‘मराठी नाटक-नाटककार भाग १ ते ३’, ‘कालचक्र- एक अभ्यास’, ‘नाटककार शिरवाडकर’, ‘नटसम्राट : एक आकलन’, ‘स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक’ अशा विषयांवरील त्यांची अनेक पुस्तके वाचकांसाठी संदर्भ म्हणून उपयोगी पडणारी आहेत. मराठीमध्ये नाटय़समीक्षालेखन विपुल प्रमाणात झाले. त्यातील माधव मनोहर हे नाव अलीकडील काळात अग्रभागी राहिले. विभांनी मनोहरांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले लेखन विकसित केले. परंतु त्यांनी मनोहरांसारखी विखारी टीका मात्र टाळली. नाटक आवडले नसले, तरीही त्याविषयी लिहिताना टोकाची भूमिका विभांनी कधी घेतली नाही. उलट नाटकातल्या अभिनेत्यांशी आणि दिग्दर्शकाशी चर्चा करून त्यातील चुका समजावून सांगणे त्यांना अधिक पसंत असे. सार्वजनिक पातळीवर टीकाकार म्हणून मिरवण्यापेक्षा रंगमंचीय मित्र अशीच आपली प्रतिमा असायला हवी, असा त्यांचा स्वभाव. त्यामुळे टीका करूनही अजातशत्रू होणे त्यांना शक्य झाले. नाटकाशी संबंधित अशा सामाजिक विषयांमध्येही त्यांना रस होता. संगीत नाटकासारखा वेगळ्या  धाटणीचा आविष्कार असो, की दक्षिणेकडील संपन्न नाटय़परंपरा असो, त्याचे सामाजिक भान शोधण्यासाठी ते भारतभर हिंडले. विभांनी नाटक हेच आपल्या आयुष्याचे साध्य मानले आणि त्यामुळे अगदी शेवटपर्यंत नवे विषय हाताळण्याची त्यांची ऊर्मी कायम राहिली. त्यांच्या निधनाने रंगभूमीने एक सच्चा मित्र गमावला आहे.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
What DCM Devendra Fadnavis Said About Nana Patole?
नाना पटोलेंच्या कार अपघातावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, “महाराष्ट्राच्या राजकारणात…”
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?