07 July 2020

News Flash

वेद मारवा

 दिल्लीचे माजी पोलीस प्रमुख आणि तीन राज्यांचे माजी राज्यपाल ही त्यांची एक ओळख

वेद मारवा

अभ्यासू, लेखन-वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्ती जर कर्तृत्ववानही असतील, तर त्यांच्या कर्तृत्वाला परिस्थितीच्या नेमक्या आणि विनम्र जाणिवेचे अस्तर असते. वेद मारवा हे अशा कर्तृत्ववानांपैकी एक. गोवा मुक्कामी ५ जून रोजी त्यांचे निधन झाले.

दिल्लीचे माजी पोलीस प्रमुख आणि तीन राज्यांचे माजी राज्यपाल ही त्यांची एक ओळख, तर ग्रंथप्रेमी आणि ग्रंथलेखक हा त्यांचा तितकाच महत्त्वाचा पैलू. राजधानीत १९८५ ते १९८८ ते पोलीस आयुक्त होते. हे पद थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीतले. शेजारील पंजाबात ज्युलिओ रिबेरो आणि केपीएस गिल यांची कारकीर्द सुरू असताना दिल्लीची कायदा-सुव्यवस्था वेद मारवा यांनी सांभाळली. १९८८ ते ९० या काळात ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स’चे महासंचालकपद त्यांच्याकडे होते. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले, राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोरणे आखणाऱ्या अनेक स्थायी व अस्थायी समित्यांवर कार्यरत राहिले आणि त्याहीनंतर, मणिपूर (१९९९-२००३) आणि झारखंड (२००३-०४) या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मणिपूरच्या राजभवनात असतानाच मिझोरमच्या राज्यपाल पदाचीही जबाबदारी त्यांनी वर्षभर (२०००-०१) सांभाळली. ईशान्येकडील राज्यांत हा काळ अस्थैर्याचाच. अस्मिता-वैविध्यातून येणारी राजकीय स्पर्धा प्रसंगी दहशतवादापर्यंत कशी जाते, हे या काळात त्यांनी जवळून पाहिले.

पेशावर येथे ८७ वर्षांपूर्वी जन्मलेले वेद मारवा फाळणीच्या सुमारास भारतात आले, दिल्लीच्या प्रतिष्ठित ‘सेंट स्टीफन्स’ महाविद्यालयात शिकले आणि मँचेस्टर विद्यापीठातून लोकप्रशासनाची पदविका घेऊन ‘भारतीय पोलीस सेवे’त रीतसर दाखल झाले. तेव्हापासून, कोलकात्यातील पोलीस उपायुक्तपदाची कारकीर्द सोडल्यास ते दिल्लीतच अधिक होते. दहशतवाद आणि देशांतर्गत अतिरेकी संघटना यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला, त्यातून ‘अनसिव्हिल वॉर्स : पॅथॉलॉजी ऑफ टेररिझम इन इंडिया’ (१९९७) हे पुस्तक सिद्ध झाले. ईशान्य भारतात डाव्या संघटना अस्मितावादालाच कशा खतपाणी घालताहेत, तसेच जम्मू-काश्मीरच्या दहशतवादाचे आव्हान नेमके कसे आहे या विषयांवरही त्यांनी पुस्तके लिहिली. ‘क्रेड्ढा’ या नेदरलँड्सच्या शांतता-वाटाघाटी संस्थेने त्यांचा ‘ऑटॉनॉमी इन जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर’ हा अभ्यासग्रंथ प्रकाशित केला होता, तर इंडियाना विद्यापीठाने ‘काऊंटरटेररिझम इन पंजाब’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. वेद यांचे वडील फकीरचंद. दिल्लीच्या खान मार्केटमध्ये विख्यात ‘फकीरचंद अ‍ॅण्ड सन्स’ हे ग्रंथदुकान आहे, ते मारवा कुटुंबीयांचे, ही आणखी एक ओळख!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 12:01 am

Web Title: ved marwah profile abn 97
Next Stories
1 श्यामला भावे
2 टेरी एल एर्विन
3 क्रिस्टो (क्रिस्टो व्लादिमिरोव जावाचेफ)
Just Now!
X