भावगीताच्या विश्वात रममाण होण्याआधीपासूनच वीणा चिटको यांच्या मनावर अभिजात संगीताचे संस्कार झाले होते. संगीतकलानिधी मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या घरात जन्म मिळण्याचे भाग्य त्यांच्या वाटय़ाला आले. त्या भाग्याचे स्वत:च्या सर्जनात रूपांतर करण्याएवढी प्रतिभा त्यांच्यापाशी होती. अन्यथा अभिजात संगीताच्या तालेवार गायकीत राहूनही मास्तरांनी ललित संगीतात जे प्रचंड योगदान दिले, त्याची सर वीणाताईंकडे येती ना. जी. एन. जोशी यांनी लावलेले भावगीताचे रोपटे बहरू लागले असताना वीणाताईंनी त्यामध्ये आपलीही प्रतिभा ओतण्याची तयारी सुरू केली आणि त्यांना त्यात मोठे यश मिळाले.
ज्या काळात ‘मत्स्यगंधा’ या संगीत नाटकाने नाटय़संगीताचा बाजच बदलून टाकला होता, त्या काळात रामदास कामत हे नाव सर्वतोपरी झाले होते. अभिजात संगीताशी असलेले नाते घट्ट करीत असतानाच, त्यामध्ये लालित्याचे पदन्यास निर्माण करण्याची अजब किमया पंडित जितेंद्र अभिषेकी यांना लाभली होती. रामदास कामतांच्या आवाजात भावगीतांचा आविष्कार घडवून आणण्याचा वीणाताईंचा हट्ट म्हणूनच वेगळा वाटणारा होता. वाटे भल्या पहाटे, मयूरा रे फुलवीत येरे पिसारा, सांग प्रिये सांग प्रिये यांसारखी भावगीतांच्या विश्वात अभिजाततेचा पिसारा फुलवणारी गीते वीणाताईंनी संगीतबद्ध केली. स्वत: कवयित्री असल्याने शब्द आणि स्वर यांचा अनोखा संगम त्यांच्याठायी होताच. निवडक गीतांच्या प्रसिद्धीने पहिल्या भावगीताच्या स्त्री संगीतकार म्हणून त्यांनी आपली मोहोर उमटवली. संगीतात सतत काही नवे करीत राहण्यापेक्षा आपल्याजवळ जे देण्यासारखे चांगले आहे, तेच आणि तेवढेच द्यावे, हे वीणाताईंच्या जीवनाचे सूत्र असावे. अन्यथा लोकप्रियता मिळतेच आहे, तर संगीताचा कारखाना काढणे त्यांना अशक्य नव्हते. बालगंधर्व हे त्यांच्या अभ्यासाचे ठिकाण होते. त्यांच्या बालपणात संगीत नाटकांना ओहोटी लागलेली होती आणि चित्रपटांच्या रूपेरी जगाचे आकर्षण वाढत होते. तरीही बालगंधर्वानी संगीत रंगभूमीवर जे काही अपूर्व कार्य केले, त्याबद्दल वीणाताईंच्या मनात आदरभाव असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. घरात सतत ये-जा असणाऱ्या या महागायकाचा अभ्यास हे त्यांचे एक जिव्हाळ्याचे स्थानही बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्धप्रार्थना’ ध्वनिमुद्रणात त्यांचा सहभाग होता. संगीताच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने यश मिळवलेल्या वीणाताईंच्या निधनाने ललित संगीताच्या विश्वातील एक चमचमणारी चांदणी निखळून पडली आहे.

Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?