News Flash

सुनील देशपांडे

कायम कार्यकर्त्यांच्या गराडय़ात वावरणारे हे व्यक्तिमत्त्व करोनापुढे टिकाव धरू शकले नाही.

मेळघाटातील लवादा या छोटय़ा गावात आदिवासींच्या स्वयंपूर्णतेसाठी बांबूवर आधारित उद्योग सुरू करणारे संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सुनील गुणवंतराव देशपांडे यांना ‘वेणुपुत्र’ म्हणून ओळखले जाई. १९९४  साली ते मेळघाटात दाखल झाले आणि १९९७मध्ये बांबू प्रशिक्षण, उत्पादन आणि विपणन यांसाठी ‘संपूर्ण बांबू केंद्र’ ही संस्था त्यांनी रजिस्टर केली. येथील बांबूपासून तयार केलेल्या राखीचा ‘सृष्टीबंध’ हा ब्रॅण्ड त्यांनी तयार केला. हीच राखी मेळघाटातील आदिवासी महिला कारागिरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधली. विद्यार्थी जीवनापासून समाजकार्याची आवड असणाऱ्या या वेणुपुत्राने एमएसडब्ल्यू केल्यानंतर बांबूवरच काम करण्याचे निश्चित केले होते. ‘अ.भा.वि.प.’चे ज्येष्ठ कार्यकर्ते राहिलेले देशपांडे नंतर ‘अखिल भारतीय कारागीर पंचायत’चे राष्ट्रीय संघटक झाले. बांबूवर काम करण्यासाठी विनू काळे यांनी मार्गदर्शन केले; तर नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट प्रकल्पातील त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेची स्थापना करून स्थानिक आदिवासींना बांबू कला शिकवण्यास सुरुवात केली. त्यातून तिथल्या आदिवासींना रोजगार मिळू लागला. कारागीर पंचायतमार्फत ‘हुनर खोज यात्रे’च्या माध्यमातून त्यांनी देशभरातील हरहुन्नरी लोकांचे संघटन केले. भारतात विविध ठिकाणी त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले. मेळघाटातील बांबूच्या वस्तूंना देशभरात ओळख मिळवून देण्याच्या प्रयत्नात ते यशस्वीदेखील झाले. विलक्षण चिकाटी असलेले हे व्यक्तिमत्त्व येथवरच थांबले नाही तर त्यांनी प्रशासकीय उदासीनतेत अडकलेल्या बांबूला त्यातून बाहेर काढले. बांबूपासून राख्या आणि विविध कलावस्तूंना त्यांनी देशभरात बाजार उपलब्ध करून देत आदिवासींना स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय पूर्ण केले. याच राखीच्या माध्यमातून प्राणवायू पुरवणाऱ्या झाडांचे बीज सस्नेह भेट देण्याचे पर्यावरणपूरक मार्ग त्यांनी दाखवून दिला. पत्नी निरुपमा यांनी त्यांना प्रत्येक कार्यात साथ दिली. बारा बलुतेदारांचा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. आधुनिकतेच्या गराडय़ात बारा बलुतेदारांची ओळख नाहीशी होत असल्याचे त्यांना जाणवले. त्यासाठी मेळघाटातील हरिसालजवळील कोठा येथे त्यांनी ग्रामज्ञानपीठाची उभारणी केली. या ठिकाणी लोहारकाम, सुतारकाम शिकवले जाते. मेळघाटातील छोटय़ाशा गावातील संपूर्ण बांबू केंद्राने त्यांना जगभरात ओळख दिली. तर सिपना शोधयात्रेतून त्यांचे धडपडे नेतृत्व समोर आले. अलीकडेच गोंडवाना विद्यापीठातर्फे त्यांना डी.लिट. जाहीर झाली होती. कायम कार्यकर्त्यांच्या गराडय़ात वावरणारे हे व्यक्तिमत्त्व करोनापुढे टिकाव धरू शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 12:39 am

Web Title: venuputra sunil deshpande work profile zws 70
Next Stories
1 सुभद्रा सेनगुप्ता
2 जे. के. दत्त
3 सुनील जैन
Just Now!
X