News Flash

सुरेखा सिक्री

१९७८ मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले

सुरेखा सिक्री

सहकलावंतांनी विविध भूमिका केल्या तरी त्यापैकी एखाद-दोन प्रकारच्या व्यक्तिरेखाच प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात. सुरेखा सिक्री मात्र याला अपवाद; कारण ‘मम्मो’ सिनेमातील आजीची भूमिका, अगदी अलीकडची ‘बधाई हो’ सिनेमातील आजीची भूमिका तसेच ‘बालिका वधू’ या अनेक भारतीय भाषांत डब झालेल्या हिंदी मालिकेतील दादीसा ही आजीचीच पण प्रमुख भूमिका यांतून ‘आजी’चे निरनिराळे पैलू त्यांनी दाखवले. २००८ पासून ते २०१६ पर्यंत अशी तब्बल नऊ वर्षे ‘दादीसा’ देशभर पोहोचली.

सुरेखा सिक्री यांचा चेहरा पाहिल्यावर जुन्या हिंदी सिनेमाच्या चाहत्यांना अभिनेत्री लीला चिटणीस यांची मुद्रा आठवल्याशिवाय राहत नाही. १९७१ मध्ये राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीची सात-आठ वर्षे सुरेखा सिक्री यांनी एनएसडी रेपेर्टरी कंपनीत फक्त रंगभूमीसाठीच काम केले. रंगभूमीसाठीच्या या योगदानाबद्दल त्यांना पुढे १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. १९७८ मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. राजो या ‘तमस’मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा सिनेमा म्हणून तयार केला जाण्यापूर्वीच दूरदर्शनवर मालिका प्रदर्शित झाली होती. त्यामुळे एका अर्थी सुरेखा सिक्री यांचे याद्वारे १९८८ सालीच छोटय़ा पडद्यावर पदार्पण झाले असे म्हणता येईल. पुढे सईद मिर्झा दिग्दर्शित ‘सलीम लंगडे पे मत रो’, प्रकाश झा दिग्दर्शित ‘परिणती’, मणी कौल दिग्दर्शित ‘नजर’ अशा समांतर सिनेमांमधून त्या प्रेक्षकांसमोर आल्या आणि त्या धारेतीलच श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘मम्मो’ या सिनेमातील फैय्याजीच्याच भूमिकेसाठी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्याम बेनेगल दिग्दर्शित चित्रपटत्रयी म्हणजे ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ आणि ‘झुबैदा’ या तिन्हींमध्ये सुरेखा सिक्री यांनी भूमिका साकारल्या हेही एक विशेष. ‘काली सलवार’, ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस अय्यर’, ‘नसीम’ अशा समांतर सिनेमांतही त्या होत्या. ९० नंतरच्या काळात ते अगदी अलीकडेपर्यंत मात्र, भरपूर टीव्ही मालिका व मुख्य प्रवाहातील सिनेमे यातून त्यांनी छोटय़ा-मोठय़ा अनेक भूमिका साकारल्या. टीव्ही मालिकाविश्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या टेली अ‍ॅवॉर्डनेही सुरेखा सिक्री यांचा गौरव करण्यात आला होता. २०१८ व त्यानंतर २०२० मधील आजारपणामुळे अभिनय करण्यात काही काळ खंड पडला असला तरी अखेपर्यंत त्या सातत्याने आणि चोखपणे कार्यरत राहिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2021 3:33 am

Web Title: veteran actress surekha sikri profile zws 70
Next Stories
1 यशपाल  शर्मा
2 पी. के. वारियर
3 श्याम सुंदर जानी
Just Now!
X