31 October 2020

News Flash

राजू भारतन

१९५२ मध्ये इंग्लंडच्या क्रिकेट दौऱ्याहून परतल्यानंतर त्याबद्दलही भारतन यांनी पुस्तक लिहिले.

चित्रपटसंगीत आणि क्रिकेट या दोन्ही विषयांवर अक्षरश: प्रभुत्व असणे, हे पत्रकार म्हणून फार थोडय़ांच्या वाटय़ाला येत असेल. राजू भारतन हे नाव या दोन्ही विषयांतील रसिकांसाठी गेली अनेक दशके अतिशय आवडते राहिले. याचे एक कारण त्यांची लेखनशैली आणि दुसरे म्हणजे त्या विषयातील माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता. ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या नियतकालिकात या दोन्ही विषयांवर अमाप लेखन करणाऱ्या भारतन यांच्या नावावर या विषयातील अनेक पुस्तकांचीही नोंद आहे. चित्रपटसंगीताच्या क्षेत्राला ‘सेलिब्रिटी’ची चकाकी आणि झळाळी मिळवून देणाऱ्या राजू भारतन यांनी केवळ खलबते किंवा अफवा यावर भर दिला नाही. त्यापलीकडे जाऊन या संगीताची खुमारी समजावून सांगत त्याची अनेक वैशिष्टय़े रसिकांसमोर सादर केली.

कलावंत किंवा खेळाडू यांची खुशमस्करी करण्यापेक्षा पत्रकार म्हणून नेहमी तटस्थ राहण्याची भारतन यांची हातोटी अनुकरणीय अशी. त्यामुळे ज्या लता मंगेशकर यांच्यामुळे ते चित्रपटसंगीतावरील लेखनाकडे वळले, त्यांच्याबद्दल सटीक लेखन करताना, कलाकाराच्या भोवती असणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेची अडचण त्यांना कधी भासली नाही. फिल्म्स डिव्हिजनसाठी ‘द व्हिक्टरी स्टोरी’ हा पूर्ण लांबीचा अनुबोधपट दिग्दर्शित करणाऱ्या राजू भारतन यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, संगीतकार नौशाद यांची चरित्रे लिहिली. १९५२ मध्ये इंग्लंडच्या क्रिकेट दौऱ्याहून परतल्यानंतर त्याबद्दलही भारतन यांनी पुस्तक लिहिले. संगीतकार आणि कलावंतांच्या संगतीत राहिल्याने त्यांच्या वर्तनशैलीबद्दल थेट लिहिणारे पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक झाला. ‘तस्वीर बनाता हूँ’ हे गीत संगीतकार नशाद यांनी स्वरबद्ध केले, तरीही ते त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांच्या नावावर कसे जमा झाले, याची रोचक गोष्ट ते जसे खुमासदारपणे सांगतात, तसेच, लता आणि आशा यांच्यातील स्वरद्वंद्वही ते तेवढय़ाच हिमतीने लिहितात. चित्रपटसंगीताकडे पाहण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन आणि त्याबद्दल त्यांच्याकडे असलेला माहितीचा खजिना यामुळे त्यांचे लेखन अतिशय लोकप्रिय झाले.

त्यांच्या क्रिकेटवरील लेखनातील वेगळेपणामुळे भारतात त्यांचे असंख्य चाहते निर्माण झाले. अनेकांनी या लेखनामुळे आपल्याला क्रिकेटचे वेड लागल्याची जाहीर कबुली दिली. केवळ लेखनाच्या जोरावर एखादा पत्रकार स्वत:ची वेगळी ओळख बनवतो, हे क्वचित दिसणारे चित्र राजू भारतन यांनी साध्य करून दाखवले. संगीताचे विश्लेषण करता करता, त्यातील अनेक नाजूक जागांबद्दल ते इतक्या सौंदर्यपूर्ण रीतीने लिहीत, की त्यामुळे ते गीत आवडायला मदत व्हावी. त्याचे अर्थ अधिक गहिरे होऊन समोर यावेत आणि वाचकाचा त्यावर जीव जडावा. हे केवळ लेखनशैलीचे कसब नसून त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्टही कारणीभूत असतात. वयाच्या ८२ वर्षी त्यांनी आशा भोसले यांचे चरित्र प्रकाशित केले आणि बराच काळ पत्रकारितेच्या परिघाबाहेर राहिलेल्या भारतन यांना पुन्हा संजीवनी मिळाली. वयाच्या ८६ व्या  वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे लेखन आणि त्यांच्या आठवणी वाचकांच्या सदैव स्मरणात राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 4:43 am

Web Title: veteran cricket journalist raju bharatan profile zws 70
Next Stories
1 विजयालक्ष्मी दास
2 पवन सुखदेव
3 व्हाकिन फिनिक्स
Just Now!
X