23 March 2019

News Flash

विनोद भट्ट

विनोद नी नझारे’ नावाची मालिका ते कुमार मासिकातून लिहीत होते.

विनोद भट्ट

बुधवारी अहमदाबादेत बॅण्डबाजा लावून एक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. तो होता एका जिंदादिल व समरसतेने जीवन जगलेल्या साहित्यिकाचा मरण सोहळा. त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, तरी त्यांनी वैद्यकीय संशोधनासाठी देहदान केले होते. त्या साहित्यिकाचे नाव विनोद भट्ट. विनोदकाका नावाने ते ओळखले जात. विनोद भट्ट यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते कधीच कुणा लेखकाच्या प्रभावाखाली आले नाहीत. दुसरे म्हणजे त्यांच्यासारख्या शैलीत कुणी लिहूही शकले नाहीत. ज्योतिंद्र दवे व बकुल त्रिपाठी यांच्या पंक्तीत बसू शकतील असे ते प्रतिभाशाली साहित्यिक होते. गुजरात समाचारसह अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केले होते. त्यातील ‘इदम तृतीयम’ व ‘माग नू नाम मारी’ हे स्तंभ गाजले होते. टीका, चरित्र, निबंध या आकृतिबंधातील एकूण ४५ पुस्तके त्यांनी लिहिली.

त्यांचा जन्म १९३८ मध्ये गांधीनगर जिल्ह्यत देहगाम तालुक्यात नांदोल येथे झाला. एच. एल. कॉलेजमधून ते पदवीधर झाले व नंतर कर सल्लागाराचा व्यवसाय सुरू केला. पेहलू सुख ना मुंगी नार, सुनो भाई साधो, विनोद भटना प्रेम पत्रो, हास्यायन, श्लील-अश्लील, नरो वा कुंजरो वा ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके. कुमार चंद्रक, रणजितराम सुवर्ण चंद्रक, रमणभाई निळकंठ पुरस्कार, ज्योतिंद्र दवे पुरस्कार असे मानसन्मान त्यांना लाभले. ते १९९६-९७ या काळात गुजरात साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला हे त्यांच्याच शाळेत होते. ते गुजरात साहित्य परिषदेसाठी देणगी मागण्यासाठी वाघेला मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले व त्यांच्याकडून चक्क ५१ लाखांचा धनादेश मिळवला होता, त्या वेळी साहित्य परिषदेतील इतरांना आश्चर्य वाटले. काहींनी हा धनादेश वटणार ना, असेही विचारले पण वाघेला यांच्याशी त्यांचे फारच घनिष्ठ मैत्र होते. नवचेतन व युवक या दोन नियतकालिकांत महाविद्यालयात असतानापासून त्यांनी लेखन सुरू केले, ४३ वर्षे ते वृत्तपत्रातून स्तंभलेखन करीत होते. नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद समोरासमोर मिळत असतो तसे इतर लेखन प्रकारांचे नसते, असे ते म्हणायचे. ‘विनोद नी नझारे’ नावाची मालिका ते कुमार मासिकातून लिहीत होते. त्यात त्यांनी चंद्रकांत बक्षी यांच्यावर एक लेख लिहिला तो विनोदी स्वरूपात होता, तेव्हा बक्षी चांगलेच भडकले. अर्थात हा राग नंतर निवळला. ‘दुनिया मा बधू हसी नाखवा जेवू नथी होतू’ हा त्यांचा जीवन संदेश होता. इदम चतुर्थम, आजनी लात, आने हावे इतिहास, आँख आदा कान, ग्रंथनी गरबड, अथ थी इति, हास्योपचार, विनोदमेलो, मंगल-अमंगल, भूल चूक लेवी देवी, करांके माटो-एक बदनाम लेखक ही त्यांची इतर ग्रंथसंपदा. त्यांनी चार्ली चॅप्लिन, स्वप्नद्रष्टा मुन्शी, हास्यमूर्ती ज्योतिंद्र दवे, ग्रेट शो-मन जॉर्ज बर्नार्ड शॉ, अँतोन चेकोव्ह यांची चरित्रेही लिहिली, विनोद विमर्श, श्रेष्ठ हास्यरचना, सारा जहाँ हमारा, हास्य माधुरी भाग १ ते ५, प्रसन्न गथरिया, हास्य पच्चीसी यातील काही पुस्तके हिंदीत भाषांतरित झली, याशिवाय देख कबीरा रोया, सुना त्यांचे साहित्य वाचताना जेव्हा जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर हसू विलसेल, तेव्हा तेव्हा त्यांच्या स्मृती जागत्या राहतील यात शंका नाही.

First Published on May 26, 2018 2:19 am

Web Title: veteran gujarati writer vinod bhatt profile