X

ह. मो. मराठे

हमोंनी दैनिकांत काही काळ काम केले, पण त्यांचा पिंड नियतकालिकाच्या संपादनाचा.

ह. मो. मराठे हे नाव पत्रकारितेपेक्षा साहित्याच्या क्षेत्रात अधिक गाजले. याचे कारण त्यांच्या लेखनातील वैविध्य. पत्रकारितेत राहून मिळणाऱ्या मूलद्रव्याचा कलाकृतीसाठी उपयोग करणाऱ्या अरुण साधू यांच्याप्रमाणेच हमोंनी आपल्या पहिल्याच कादंबरीने समस्त मराठी वाचकांचे लक्ष वेधले. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही ती कादंबरी. लेखकाच्या अनुभवविश्वाचे, त्यातील ताणतणावाचे आणि उद्विग्नतेचे दर्शन घडवताना, हमोंनी लेखनाचा वेगळाच बाज तयार केला. त्याच सुमारास ‘साधना’ साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘काळेशार पाणी’ या कादंबरीने अश्लीलतेच्या मुद्दय़ावर थेट न्यायालयातच जाण्याची तयारी केली. त्या काळातील ख्यातनाम साहित्यिक ना. सी. फडके यांनीच या कादंबरीला अश्लील ठरवल्यामुळे हा वाद ओढवला. साधनाच्या विश्वस्त मंडळाने मात्र हमोंच्या बाजूने उभे राहण्याचे ठरवले. आता काळाच्या कसोटीवर या दोन्ही कादंबऱ्या आपले वेगळेपण राखत साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवून आहेत.

हमोंनी दैनिकांत काही काळ काम केले, पण त्यांचा पिंड नियतकालिकाच्या संपादनाचा. ‘किलरेस्कर’ मासिकात संपादनाची जबाबदारी पेलताना किती तरी वेगळे विषय निवडून त्यांनी मासिकाचा दर्जा उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न केला.  संपादन म्हणजे नवनवे विषय शोधणे, त्यासाठी लेखक शोधणे, त्याच्याशी चर्चा करणे आणि त्याच्याकडून योग्य तसे लेखन लिहून घेणे. हमोंनी ज्या ज्या नियतकालिकांमध्ये काम केले, तेथे त्यांनी हे काम अतिशय आवडीने केले. ‘लोकप्रभा’ या इंडियन एक्स्प्रेस समूहाच्या साप्ताहिकाचे संपादक असतानाही वाचकांना त्यांच्या या वेगळेपणाचा अनुभव आलाच होता. कामाच्या या व्यापातही हमोंना त्यांची लेखनशक्ती स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे ते मिळेल त्या वेळी सतत लेखन करत राहिले. कथा, कादंबरी, वैचारिक, व्यंगकथा, उपरोधिक ललित अशा अनेक अंगांनी ते साहित्यविश्वात रमले. मित्रांमध्ये गप्पांच्या मैफलीत हमो खळाळून हसायचे आणि हसवायचेदेखील.  लेखकांमध्ये राहूनही आपली वेगळी प्रतिमा जपताना, त्यांनी आपले लेखकपण कधी अंगावर ल्यायले नाही. सतत काही लेखन करायचे तर त्यासाठी विषयांचे मूलद्रव्य शोधायला हवे. हमोंना माणसांमध्ये मिसळायला आवडत असे, त्यामुळे हे विषय त्यांना सहज सापडत असत.

एवढे साहित्य नावावर जमा झाल्यावर अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे स्वप्न पडणे त्यांच्यासाठी स्वाभाविक म्हणायला हवे; पण अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना काही एक साहित्यबाहय़ अभिनिवेश बाळगण्याची खरे तर आवश्यकताही नव्हती. हमो पत्रकार असल्याने त्यांनी ८६व्या संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत सादर केलेले निवेदन प्रचंड टीकेचा विषय बनले. ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? या त्यांच्या लेखाने आधीच राळ उडालेली होती. या निवेदनाने त्यात भर पडली आणि ती निवडणूक पुन्हा एकदा साहित्यबाहय़ कारणांसाठी चर्चेत राहिली. आपणास कोणत्याही जातीच्या श्रेष्ठत्वाचे कौतुक करायचे नाही, त्यामुळे आपण कोणत्याही जातीच्या विरोधातही नाही, उलट समाजात दिसत असलेले जातींमधील वैर संपुष्टात आणणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका ते वारंवार मांडत राहिले. त्यांच्या एका कथेवर आधारित असलेले ‘दोन स्पेशल’ हे नाटक सध्या रंगभूमीवर खूपच गाजले. त्यातील पत्रकाराच्या आयुष्यातील तात्त्विक घुसमट आजच्या व्यवहारातही किती चपखल बसते, याचा अनुभव त्यामुळे रसिकांना आला. त्यांच्या निधनाने साठोत्तरी मराठी साहित्यातील एक चांगला लेखक हरपला आहे. ‘लोकसत्ता’ची त्यांना मनापासून श्रद्धांजली.

Outbrain