23 October 2019

News Flash

सुमतीदेवी धनवटे

स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या धनवटे कुटुंबाची सून म्हणून मूळच्या ग्वाल्हेरच्या सुमतीदेवी नागपुरात आल्या.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात विदर्भाच्या साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुमतीदेवी धनवटे यांच्या निधनाने इतिहासाला सांधणारा एक दुवा निखळला आहे. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या धनवटे कुटुंबाची सून म्हणून मूळच्या ग्वाल्हेरच्या सुमतीदेवी नागपुरात आल्या. प्रसिद्ध उद्योजक असलेले त्यांचे पती मारोतराव तेव्हा काँग्रेसमध्ये होते. सुमतीदेवींनी राजकारणात फार काळ न रमता  साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात पाऊल ठेवले. सुमतीदेवींनी प्रारंभी अनेक संगीत नाटके लिहिली. त्यातली धुळीचे कण,  गीत गायले आसवांनी, तास वाजे ठणाणा, विळखा ही नाटके तेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. अभिनेत्री सीमा देव यांनी सुमतीदेवींच्याच नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. तेव्हा उदयाला आलेल्या विदर्भ साहित्य संघाचे सभागृह ही नागपुरातील धनवटे कुटुंबाचीच देणगी! याच बळावर त्या मराठी नाटय़ परिषदेत सक्रिय झाल्या. १९६१ साली त्या कार्याध्यक्ष असताना दुर्गा खोटे यांची नाटय़ संमेलनाध्यक्षपदी निवड झाली होती. दिल्लीत झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले होते. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू त्याला हजर राहिले होते. त्याआधी १९५९ ला काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात झाले होते. त्याच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्षपद सुमतीदेवींनी सांभाळले होते. ‘दवावरील पाऊलखुणा’ या त्यांच्या आत्मचरित्रात हे सारे संदर्भ येतात. साहित्य व नाटकांचे कार्यक्रम केवळ विद्वानांच्या हौशी भागवणारे नसावेत तर त्यात सामान्य जनतेचा, साहित्यप्रेमींचा सहभाग असायला हवा यासाठी त्या आग्रही असत. त्यामुळे अनेक नवोदित साहित्य संघाशी जोडले गेले. शिवराज फाइन आर्ट हा वऱ्हाड व बेरार प्रांतात प्रसिद्ध असलेला उद्योग धनवटे कुटुंबाच्या मालकीचा. सुमतीदेवींनी तोही काही काळ यशस्वीरीत्या सांभाळला. त्यांनी पुण्यात अ. भा. मराठी शिक्षण परिषद, तर मुंबईत शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणात संधी मिळावी, यासाठी या संस्थांद्वारे त्यांनी दीर्घकाळ काम केले. या संस्थांमुळे त्यांचा तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, यशवंतराव चव्हाण, विनोबा भावे, इंदिरा गांधी यांच्याशी झालेला परिचय पुढे दीर्घकाळ टिकला. विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर काम करणाऱ्या सुमतीदेवींना १९९३ मध्ये यवतमाळातील पाटणबोरीला झालेल्या वैदर्भीय लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले. यानंतर वयपरत्वे त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्वीकारली, तरी ‘शिवमुद्रा’मार्फत शिवाजी महाराजांचे स्मृतिभवन राज्यात तयार व्हावे यासाठी त्या शेवटपर्यंत प्रयत्नशील होत्या.

 

First Published on April 23, 2019 3:36 am

Web Title: veteran writer sumitdevi dhanwate