07 December 2019

News Flash

व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार

लहान युद्धनौकेपासून ते विमानवाहू युद्धनौका संचलनापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार

प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद करून प्रत्यक्ष सेवेतही कामगिरीचा आलेख सतत उंचावत नेणारे व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार यांच्यावर भारतीय नौदलाच्या उपप्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. भारतीय नौदलात हे अतिशय महत्त्वाचे पद मानले जाते.

सातारा जिल्ह्य़ातील चितळी हे पवार यांचे मूळ गाव. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे शालेय शिक्षण आंध्र प्रदेशमध्ये झाले. कोरुकोंडा येथील सैनिकी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करून ते १९८२ मध्ये नौदलात दाखल झाले. प्रबोधिनीतील प्रशिक्षणात त्यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताब मिळवला होता. ‘नौकानयन आणि दिशादर्शन’ या शिक्षणक्रमात पवार यांनी आघाडी राखत नैपुण्य प्राप्त केले. लहान युद्धनौकेपासून ते विमानवाहू युद्धनौका संचलनापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नौदलातील विविध विभाग, अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. श्रीलंकेत भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन पवन’ केले, तेव्हा पवार हे आयएनएस मगरचे नौकानयन अधिकारी होते. कारगिल युद्धाच्या वेळी पश्चिमी युद्धनौकांच्या तुकडीचे नौकानयन अधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. एडनचे आखात क्षेत्रात चाचेगिरीमुळे व्यापारी सागरी मार्गाला धोका निर्माण झाला होता. चाचेगिरीविरोधात भारतीय नौदलाने त्या क्षेत्रात युद्धनौकांची गस्त सुरू केली. तेव्हा पश्चिमी युद्धनौकांच्या तुकडीची जबाबदारी ते सांभाळत होते. भारतीय नौदलात दाखल झालेल्या नायक, कुठार, तलवार अशा महत्त्वाच्या युद्धनौकांचे त्यांनी सारथ्य केले. ‘फ्लॅग रँक’वर बढती मिळाली आणि त्यांचा अनुभव, कामगिरीचा पट अधिकच विस्तारला. प्रमुख (सागरी प्रशिक्षण), नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख, महाराष्ट्र आणि गुजरात क्षेत्राचे प्रमुख अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. व्हाइस अ‍ॅडमिरल झाल्यानंतर पवार हे नौदलाच्या सी बर्ड प्रकल्पाचे महासंचालक बनले. ब्रिटनमधील रॉयल नौदल महाविद्यालय, मुंबईतील नौदल युद्धतंत्र महाविद्यालय, दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय अशा अनेक संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. त्यात ब्रिटनच्या प्रतिष्ठित हर्बर्ट लॉट पुरस्काराचाही अंतर्भाव आहे. मुंबई  व मद्रास विद्यापीठांतून पवार हे संरक्षण आणि सामरिकशास्त्र या विषयात दोन वेळा ‘एम.फिल’ झाले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल नौदलप्रमुख तसेच मॉरिशस पोलीस यांनी त्यांना गौरविले आहे. नौदलात वेगवेगळ्या पदांची जबाबदारी सांभाळणारे नौदलासमोरील आव्हानांवर मात करताना पवार यांना हा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.

First Published on February 7, 2019 1:28 am

Web Title: vice admiral murlidhar pawar profile
Just Now!
X