काही संस्थांविषयी काहीही माहिती नसली, तरी त्यांचे केवळ नावच त्यांचे मोठेपण सांगण्यासाठी पुरेसे असते. कोकणात रत्नागिरी जिल्ह्य़ातील देवरुख येथील मातृमंदिर या संस्थेविषयी हे तंतोतंत खरे आहे. देवरुखला १९५४ साली, राजवाडे यांच्या घरात इंदिराबाई तथा मावशी हळबे नावाच्या महिलेने सुरू केलेल्या प्रसूतीगृहातून मातृमंदिर नावाच्या एका संस्थेचे बीज रोवले गेले आणि गेल्या साठ-बासष्ट वर्षांत ते सर्वागांनी बहरले. त्याच्या छायेखाली किती तरी श्रमिकांना, वंचितांना, अनाथांना सुखाच्या क्षणांचा दिलासा मिळाला. कोकणातला, केवळ पावसावर विसंबून शेती करणारा शेतकरी गरीब असला, तरी त्याने परिस्थितीला कधीच दोष दिला नाही. परवडण्यापलीकडे जाणाऱ्या या व्यवसायातील शेतकऱ्याला वेळीच आधार दिला नाही, तर कधी तरी त्याला परिस्थितीपुढे गुडघे टेकावे लागतील हे ओळखून याच मातृमंदिरात एक योजना आकाराला आली. मातृमंदिराचे सचिव विजय नारकर यांच्या घरात सतत सेवाकार्याचेच आराखडे तयार होत असत.

बॅ. नाथ पै, मधु दंडवते, ग. प्र. प्रधान आणि समाजवादी विचारसरणीच्या अनेक नेत्यांच्या वास्तव्याचे संस्कार झालेल्या मातृमंदिरातील नारकरांच्या घरात शेतकरी सबलीकरणाचा फॉम्र्युला तयार झाला आणि शेतीला ग्रामोद्योगांची जोड देणे गरजेचे आहे, हे पटवून देण्यासाठी  नारकरांनी परिसरातील गावे पालथी घातली. आरोग्यसेवा हेच मातृमंदिरचे मुख्य कार्य होते. अनाथ, पोरक्या मुलांना आधार देणारे गोकुळ नावाचे अनाथालय ही मातृमंदिरची आणखी एक ओळख होती आणि देवरुखच्याच सीमेवरच्या शेतात, पिकांचे नवनवे प्रयोगही सुरू झाले होते. जोडधंदा ही शेतकऱ्याची गरज आहे, एवढेच सांगून स्वस्थ बसणे पुरेसे नाही, हे ओळखून नारकरांनी तंत्रशिक्षण वर्गही सुरू केले आणि शेतकऱ्याची पुढची पिढी, यंत्रेही हाताळू लागली. अनेक गावांत नारकर यांच्याच प्रेरणेने बचत गट सुरू झाले, सहकारी तत्त्वावरील शेतीचे प्रयोगही यशस्वी होत गेले.  लहान गावांतील ओढे, नाल्यांवर बंधारे दिसू लागले, ग्रामविकासाचे एक वेगळे मॉडेल नारकर यांच्या पुढाकाराने संगमेश्वर-लांजा तालुक्यात उभे राहिले असले, तरी नारकर स्वत: मात्र, प्रसिद्धीपासून काहीसे अलिप्त राहूनच प्रत्येक कामात स्वत:ला झोकून देत होते.

केवळ विकासाचे कानमंत्र देऊन विकास साधत नाही. त्यासाठी सहकार्याचे भक्कम हात पुढे करावे लागतात. नारकर यांनी मातृमंदिरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषिपंप मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. रत्नागिरी जिल्ह्य़ातील शंभराहून अधिक गावांचा पाणीप्रश्न नारकर यांच्या तळमळीमुळे सुटला. ते अजातशत्रू होतेच, पण माणसे जोडताना राजकीय मतभेदांच्या भिंती कधीच आड आल्या नाहीत. शेतकऱ्याचे सबलीकरण हाच ध्यास घेऊन ग्रामीण भागात सेवाकार्याचे आणि आरोग्य सुविधांचे जाळे उभे करणारा हा साधा माणूस, अनेक मनांना संस्काराने समृद्ध करून मंगळवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेला.