दोन दिवसांच्या अंतराने दोन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्ती जाहीर होण्यातील आनंद आणि या पदांची जबाबदारीही तेवढीच महत्त्वाची. पण असा फारसा आनंद साजरा न करता ही जबाबदारी सार्थ ठरविण्यासाठी लिमये हे योग्य आहेत, अशा प्रतिक्रिया लगेच भारताच्या अर्थजगतातून मिळू लागल्या. वित्तक्षेत्रातील जवळपास तीन दशकांहून अधिक कालावधीचा अनुभव गाठीशी असलेल्या विक्रम लिमये यांची नियुक्ती देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. लिमये हे यापूर्वी आयडीएफसी लिमिटेड या आघाडीच्या वित्त पुरवठादार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आयडीएफसीने नवीन खासगी बँक व्यवसायात वर्षभरापूर्वी पदार्पण करण्याआधीपासून ते पायाभूत सेवा क्षेत्रासाठी मोठय़ा प्रमाणात अर्थसाहाय्य करणाऱ्या बाजारात सूचिबद्ध कंपनीत कार्यरत होते.

वाणिज्य शाखेची पदवी, सनदी लेखापाल, व्यवसाय व्यवस्थापनातील विदेशातील पदव्युत्तर शिक्षण असा सारा वित्तविषयक संबंध त्यांना आयडीएफसी लिमिटेडच्या मुख्याधिकारीपदापर्यंत घेऊन गेला.

बॉम्बे स्कॉटिश शाळेसाठी ते क्रिकेट खेळत. कनिष्ठ गटात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व टेनिस या खेळाद्वारे केले. खेळातील रसापोटी त्यांना दादरच्या शिवाजी पार्क क्लबशी स्वत:ला जोडता आले, तर वित्तक्षेत्रात म्हणून क्रेडिट सूस आदी आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांना कार्य करता आले. तब्बल २५ वर्षे वित्तक्षेत्राचा अनुभव असलेल्या लिमये यांनी वित्त, पायाभूत सेवाक्षेत्र आदी सरकारसह विविध समित्यांचीही जबाबदारी पार पाडली आहे. अमेरिकेत अनेक नावाजलेल्या कंपन्यांबरोबर काम करताना तो केवळ अनुभव असे म्हणत लिमये यांनी खऱ्या अर्थाने भारतातच कार्य करण्याचे व स्थिरावण्याचे निश्चित केले होते.

लिमये हे क्रिकेटचे जाणकार असल्यानेच त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्याच आठवडय़ात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे देखरेख करणाऱ्या समितीतील एक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे होत नाही तोच दोनच दिवसांनंतर व मुख्य म्हणजे मुंबई शेअर बाजाराची सूचिबद्धता होत असल्याच्या दिवशी लिमये यांच्याकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे आली.

देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजाराचे प्रमुखपद मिळविणारे लिमये हे असे पद मिळविणारे दुसरे मराठी व्यक्तिमत्त्व आहे. सध्या देशात तिसऱ्या स्थानावर असलेला व काहीसा नवागत एमसीएक्सची सूत्रे मृगांक परांजपे या अन्य एका मराठी माणसाकडे आहेत. स्पर्धक मुंबई शेअर बाजार काहीसा कासवाची शर्यत जिंकल्याप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला. स्वत: राष्ट्रीय शेअर बाजाराचीही १०,००० कोटी रुपयांच्या लक्ष्यासह प्रारंभिक खुल्या भागविक्रीसाठी तयारी असताना देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजाराची नोंदणी थेट लिमये यांच्याच मंचावर आता झाली आहे. तेव्हा राष्ट्रीय शेअर बाजाराची सूचिबद्धता यशस्वीरीत्या होणे, हे प्रमुख आव्हान लिमये यांच्यासमोर आता असेल. समभाग खरेदी-विक्रीतील उलाढाल, व्यवहारांबाबत मुंबई शेअर बाजारापासून राष्ट्रीय शेअर बाजार कोटींमध्ये अधिक असला तरी दोन्ही बाजारांतील दरी अधिक विस्तारत नेण्यासाठी लिमये यांची कसोटी महत्त्वाची ठरणार आहे.