28 January 2021

News Flash

विलासकाका पाटील-उंडाळकर

माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने काँग्रेसमधील जुनेजाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने काँग्रेसमधील जुनेजाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. तब्बल ३४ वर्षे ‘दक्षिण कराड’ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. सामान्य लोकांशी सतत संपर्क हे त्यांचे वैशिष्टय़ होते. १९६७ मध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास पाच दशके विलासकाका संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने चांगली प्रगती केली आणि राज्यातील सुस्थितीत चालणारी जिल्हा बँक म्हणून गौरविली गेली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. १९८० मध्ये यशवंतरावांच्या आग्रहाखातरच विलासकाकांनी कराड मतदारसंघातून संघटन काँग्रेसच्या वतीने लोकसभेची निवडणूक लढवली. इंदिरा काँग्रेसचे यशवंतराव मोहिते हे विजयी झाले; पण दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघात विलासकाकांना चांगली आघाडी मिळाली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासकाका दक्षिण कराड मतदारसंघातून निवडून आले व २०१४ पर्यंत सतत ३४ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

तेव्हा सातारा जिल्ह्य़ात काँग्रेसमध्ये दिग्गज मंडळी असल्याने विलासकाकांना मंत्रिपद मिळण्यास बरीच प्रतीक्षा करावी लागली. मंत्रिमंडळात त्यांनी सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, विधि व न्याय, वस्त्रोद्योग ही खाती भूषविली. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसमधील सहकारातील अनेक मातबर नेते राष्ट्रवादीमध्ये गेले. परंतु विलासकाका पाटील यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. साताऱ्यात तेव्हा काँग्रेसचे ते एकमेव आमदार होते. २००४ मध्ये राज्यात काँग्रेस आघाडीची पुन्हा सत्ता आली, पण मुख्यमंत्रिपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाला पसंती देण्याची विलासकाकांची खेळी चुकली व त्यानंतर त्यांना कधीच मंत्रिपद मिळाले नाही. कराडचेच पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले व विलासकाकांच्या राजकारणाला ओहोटी लागली. चव्हाण यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा ही पक्षश्रेष्ठींची विनंती त्यांनी मान्य केली नाही. २०१४ मध्ये चव्हाण यांना काँग्रेसने दक्षिण कराडमधून उमेदवारी दिल्याने विलासकाकांनी बंडखोरी केली. या मतदारसंघातील लढतीकडे तेव्हा राज्याचे लक्ष लागले होते. तिरंगी लढतीत चव्हाण विजयी झाले आणि विलासकाका मुख्य प्रवाहापासून दूर गेले. अलीकडच्या काळात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जुळवून घेतले होते. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी काँग्रेस विचारांशी त्यांनी कधीच फारकत घेतली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 1:22 am

Web Title: vilaskaka patil undalkar mppg 94
Next Stories
1 मायकल किंडो
2 पिअरे कारदँ
3 नि. कर्नल नरेंद्र ‘बुल’ कुमार
Just Now!
X