रिझव्‍‌र्ह बँकेत अर्थतज्ज्ञ या गटातील  डेप्युटी गव्हर्नरपद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त होते. पटेल यांना गव्हर्नरपदी बढती मिळाल्यानंतर आता त्यांच्या जागी विरल आचार्य आले आहेत. विरल हे पूर्वाश्रमीचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक ‘आचार्य’ म्हणून ओळखले जातात. राजन यांच्याबरोबर त्यांनी कामही केले आहे. राजन यांना मुदतवाढीसाठी विरोध होण्यापूर्वीच सरकारकडून विरल यांना ‘गरिबांचे राजन’ म्हणून उपाधी मिळाली होती.

अवघ्या ४२ वर्षांचे विरल यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसच्या वित्त विभागात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. राजन यांच्याप्रमाणेच अर्थविषयक अनेक निबंध त्यांनी लिहिले आहेत. ब्रेग्झिटची घडामोड होण्यापूर्वी या भागातील अनेक युरोपीय बँकांसाठी त्या त्या सरकारच्या रोख्यांकरिता अभ्यासपूर्ण अहवाल त्यांनी तयार केले आहेत. बँकांच्या भांडवलतेबाबत असो किंवा वित्तीय जोखीम किंवा सरकारच्या वित्तीय तुटीची समस्या यावरचा त्यांचा अभ्यास चांगला आहे. बँकांची आणि सरकारची सध्याची स्थिती पाहता विरल यांची नियुक्ती याच कारणासाठी आणि याच दरम्यान झाली याला केवळ योगायोग म्हणून सोडून देता येणार नाही. मुंबईच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेतून (आयआयटी) विरल यांनी संगणक अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.  न्यूयॉर्क विद्यापीठातून त्यांनी वित्त विषयात डॉक्टरेटही मिळविली. लंडन स्कूल ऑफ बिझनेस, कोलर इन्स्टिटय़ूट, बँक ऑफ इंग्लंड येथेही त्यांनी काम केले आहे.

‘सा रे ग म प’ फेम हृषीकेश व प्राजक्ता या गायकांसाठी २००६ मध्ये तयार केलेल्या ‘यादों के सिलसिले’ अल्बमसाठी त्यांनी संगीत दिले आहे. गिटारवादक विरल यांनी  दहाहून अधिक गाण्यांना चाली लावल्या आहेत.   ‘क्या ये वोही फिर रात है’ हा गाण्यांचा त्यांचा अन्य  अल्बमही प्रसिद्ध आहे. याच माध्यमातून ते ‘प्रथम’ या सेवाभावी संस्थेकरिता निधी उभारणीही करतात. मुलांच्या शिक्षणाकरिता हा निधी खर्च केला जातो.  निश्चलनीकरणातील गोंधळ, वाढती महागाई आणि खुंटणारा विकास दर, रोडावती निर्यात, चलन अवमूल्यन, पायाभूत-निर्मिती क्षेत्रातील मरगळ अशी आव्हाने देशासमोर असताना नियामक संस्थेला खऱ्या अर्थाने एका अर्थतज्ज्ञाची आवश्यकता होती.

विरल यांचा राजन यांच्या तुलनेतील अनुभव कमी असला तरी आंतरराष्ट्रीय आर्थिक गणिताची जाण असल्याने ही दरी काही प्रमाणात तरी कमी होईल.  विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल हे अशा गटातील असतानाही राजनच सारे खेचून न्यायचे. तेव्हा आता ते गव्हर्नर झाल्याने ही उणीव विरल यांना भरून काढण्याची संधी आहे. पटेलांचे रिक्त पद भरण्यास चार महिन्यांचा कालावधी लागला असला तरी सध्याच्या बिकट अर्थस्थितीत विरल यांच्या रूपाने रिझव्‍‌र्ह बँकेलाही अखेर ‘सूर’ गवसलाच.