23 April 2019

News Flash

विश्वेश्वर दत्त सकलानी

हिमालयाच्या कुशीत मोठे धरण व ‘विकास’ प्रकल्प राबवल्याने पर्यावरणाची हानी झाली.

विश्वेश्वर दत्त सकलानी

काम एकपट व प्रसिद्धी दहापट अशा हल्लीच्या काळात असताना उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या कुशीत लाखो झाडे लावण्याचे काम करणारे विश्वेश्वर दत्त सकलानी यांचे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य होते. पर्यावरणरक्षणासाठी सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट यांच्या खांद्यास खांदा लावून त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय असलेला एकांडा शिलेदार आपण गमावला आहे. ते स्वातंत्र्यसैनिकही होते. वृक्षलागवडीचे काम अर्धशतकभर करूनही, जिवंत असताना त्यांच्या या कामाला कधीच मान्यता मिळाली नाही. १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना वृक्षमित्र पुरस्कार जाहीर केला होता, पण त्यांचे काम बघता तो फारच किरकोळ स्वरूपाचा होता.

सन १९२२ मध्ये जन्मलेल्या सकलानी यांनी वयाच्या दहाव्या वर्षी पहिले रोप लावले, नंतर पर्यावरणरक्षण व वृक्ष लागवड हेच त्यांचे श्रेयस व प्रेयस बनले. डेहराडूनपासून ५० किमी अंतरावर त्यांचे बंधू अमर शहीद नागेंद्र दत्त यांच्या नावाने त्यांनी स्मृतिवन सुरू केले. त्यातून यमुनेच्या एका उपनदीला जीवदान मिळाले. जंगलातील नद्यांचे पुनरुज्जीवन त्यांनी मोठय़ा प्रमाणात केले होते. दोनशे वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील एका विवाहात १०० देवदार वृक्ष हुंडा म्हणून देण्यात आले होते, अशी कथा ते सांगत! सुरुवातीला खाणकामविरोधी आंदोलनात ते उभे ठाकले. नंतर १९७० च्या चिपको आंदोलनातही ते आघाडीवर होते. राजकारणातील सवरेदयी प्रवाहाचा वारसा घेऊन त्यांनी गांधीवादी तत्त्वज्ञान अंगीकारले. सकलानी यांना वृक्षमित्र पुरस्कार मिळूनही, ‘जंगलात विनापरवाना झाडे लावल्या’चे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. विद्यासागर नौटियाल यांनी त्यांच्या विरोधातील सर्व खटले लढवून ते रद्दबातल करायला लावले.

हिमालयाच्या कुशीत मोठे धरण व ‘विकास’ प्रकल्प राबवल्याने पर्यावरणाची हानी झाली. त्यातूनच केदारनाथसारख्या दुर्घटना घडल्या. कुमाऊं व गढवालमधील जंगलात मोठी जैवविविधता आहे, नद्या आहेत, त्यांना वाचवण्याची गरज ओळखून सकलानी यांनी शांतपणे प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्यासारख्या ‘वृक्ष पुरुषा’चा वारसा तरुणांनी पुढे नेण्याची गरज आहे पण त्यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल.

First Published on January 23, 2019 1:36 am

Web Title: vishweshwar dutt sakalani profile