19 September 2020

News Flash

विल्यम इंग्लिश

संगणकाचे ‘वाहन’ ठरलेल्या माऊसचा परिचय आता सर्वानाच आहे. या माऊसची पहिली निर्मिती केली होती ती विल्यम इंग्लिश यांनी.

विल्यम इंग्लिश

संगणकाचे ‘वाहन’ ठरलेल्या माऊसचा परिचय आता सर्वानाच आहे. या माऊसची पहिली निर्मिती केली होती ती विल्यम इंग्लिश यांनी. हा माऊस आता वायरलेस झाला असला तरी त्याला वायरची शेपटी असे. आपण जो वापरतो, तसा माऊस बाजारात आणला तो अ‍ॅपल कंपनीने १९८३ मध्ये, पण माऊसची संकल्पना ‘बिल’ ऊर्फ विल्यम इंग्लिश यांनी १९६२ मध्येच मांडली होती. माऊसच्या या निर्मात्याचे नुकतेच निधन झाले. खरे तर १९६२ मध्ये ऑगमेंटिंग ह्य़ुमन इंटलेक्ट या शोधनिबंधात माऊसची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र स्टॅनफर्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे डग्लस एंजलबर्ट व विल्यम इंग्लिश यांनी संगणकाच्या माऊसची निर्मिती केली होती. त्यापैकी एंजलबर्ट यांचा मृत्यू २०१३ मध्ये झाला. या द्वयींपैकी १९६८ मध्ये इंग्लिश यांनी पहिल्यांदा त्याचे प्रात्यक्षिक दाखवले! एंजलबर्ट हे संशोधक होते; पण इंग्लिश यांना संकल्पनांचे स्पष्ट आकलन होते त्यामुळेच संगणकाचा माऊस प्रत्यक्षात घडवला. थोडक्यात इंग्लिश नसते, तर निव्वळ संशोधकांनी काही माऊस आणला नसता. याच विल्यम यांनी स्पर्श पडद्याची (टच स्क्रीन) संकल्पनाही त्या काळात मांडली होती. संगणकाचा वापर सोपा करण्यात माऊसचा मोठा वाटा आहे, असे स्टीव्ह जॉब्ज यांनीही म्हटले होते. कारण त्यातून अगदी सुरुवातीच्या काळात कामाचा वेग अनेक पटींनी वाढू शकला.

विल्यम इंग्लिश यांचा जन्म केंटुकीत १९२९ मध्ये झाला. त्यांनी अमेरिकी नौदलात नोकरी केली. त्यापूर्वी विद्युत अभियांत्रिकी विद्यापीठातून पदवी घेतली. पहिला माऊस हा लाकडी ठोकळा व खाली स्टीलचे चाक या स्वरूपातला होता. त्याला एक लाल बटनही होते. संगणकाच्या पडद्यावरचे शब्द, अक्षरे ‘सिलेक्ट’ करण्याचे काम हा माऊस त्या वेळी करीत असे. कालांतराने तो लोकप्रिय झाला व वापरण्यास सोपे असे बदल त्यात होत गेले. आधुनिक संगणकात वापरला जाणारा ‘ग्राफिकल डेस्कटॉप इंटरफेस’ हा पडदा इंग्लिश यांनीच तयार केला होता. इंग्लिश हे स्टॅनफर्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटमधून १९७१ मध्ये बाहेर पडले व झेरॉक्सच्या पार्क रिसर्च सेंटरमध्ये गेले. तेथे त्यांनी माऊसच्या चाकाच्या जागी फिरता घनगोल लावला. नंतर तशीच रचना सर्वमान्य झाली. या संशोधनावर कंपनीचा हक्क असल्याने त्यांना यातून फारशी अर्थप्राप्तीही झाली नव्हती. या संशोधनातून संगणकाची मात्र प्रगती झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:01 am

Web Title: william english profile abn 97
Next Stories
1 देवेन्द्रनाथ पाणिग्रही
2 ली तेंग-हुइ
3 राम प्रधान
Just Now!
X