05 August 2020

News Flash

जया अरुणाचलम

जया अरुणाचलम यांनी असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी तमिळनाडूत पहिल्या काही महिला बचतगटांची स्थापना केली.

‘महिला बचतगट’ हा शब्दप्रयोगही ज्या वेळी वापरात नव्हता तेव्हा जया अरुणाचलम यांनी असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी तमिळनाडूत पहिल्या काही महिला बचतगटांची स्थापना केली. १९७८ साली त्यांनी ‘वर्किंग विमेन्स फोरम’ ही संस्था स्थापली आणि कामकरी महिलांना स्वत:च्याच बचतीतून स्वयंरोजगारासाठी कर्जाचे दार उघडून दिले. यानंतर दहा वर्षांच्या आत, १९८७ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले आणि ‘असंघटित महिलांचे संघटन’ हे जया अरुणाचलम यांचे ध्येय आणखी उजळून निघाले. जया अरुणाचलम यांचे अलीकडेच (२९ जून) निधन झाल्याची बातमी आली, तेव्हा ‘वर्किंग विमेन्स फोरम’च्या सदस्य असलेल्या किमान सहा लाख महिलांना घरचे माणूस गेल्याचे दु:ख झाले.

जया यांचा जन्म १९३५ सालचा. स्वातंत्र्योत्तर काळात अर्थशास्त्र आणि भूगोल या विषयांतील पदव्युत्तर पदव्या घेऊन, वॉशिंग्टन येथून व्यवस्थापनशास्त्राची पदविका मिळवून त्या चेन्नईस परतल्या आणि गृहिणी म्हणून घर सांभाळतानाच काँग्रेस पक्षाचे काम करू लागल्या. १९७७ साली चेन्नईच्या गरीब वस्त्यांना पुराचा तडाखा बसला, तेव्हा मदतकार्याच्या सरधोपट रीतीप्रमाणे त्यांनीही कपडे, भांडी, धान्य या वस्त्यांमध्ये वाटण्यासाठी नेले. पण ‘यांना पुराचा नव्हे, गरिबीचाच फटका बसला आहे’ हे सत्य जया यांना जाणवले आणि मग ‘दररोज गरीब वस्त्यांत जायचे, महिलांशी बोलायचे, त्यांची स्थिती आणि त्यांच्या गरजा ओळखायच्या’ हा त्यांचा क्रम सुरू झाला. यातूनच ‘वर्किंग विमेन्स फोरम’ची स्थापना झाली. वस्तीवस्तीतल्या महिलांचे छोटे गट या फोरमशी संबंधित आहेत.

फोरमचे आजचे स्वरूप केवळ बचतगटांची महासंस्था असे नसून महिलांसाठी ते एक ऊर्जाकेंद्र आहे. नेतृत्व प्रशिक्षण, महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या गटांची स्थापना, संशोधन असा या फोरमचा पसारा आहे. गरीब महिलांच्या पैशावर संस्था चालवायची नाही, म्हणून या संस्थाखर्चासाठी परकीय देणग्या स्वीकारताना फोरमने कारभार स्वच्छ आणि पारदर्शकच ठेवला.

पद्मश्रीखेरीज २००९ चा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’, जर्मनीतील ल्यूएनबर्ग विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट, अमेरिकेतील केनेडी सेंटरशी संबंधित ‘व्हायटल व्हॉइसेस ग्लोबल पार्टनरशिप’कडून कारकीर्द गौरव (२००५) आदी पुरस्कार त्यांना मिळाले. तमिळनाडू काँग्रेस समिती आणि अ. भा. महिला काँग्रेस समितीशीही त्यांचा संबंध होता; परंतु निवडणुकीच्या राजकारणापासून त्या कटाक्षाने दूर राहिल्या. त्याऐवजी, नियोजन आयोगापासून अनेक पातळ्यांवर महिलांच्या भल्याचे सल्ले देऊन त्यांनी देशसेवा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 2:07 am

Web Title: working women s forum founder jaya arunachalam profile zws 70
Next Stories
1 मुहम्मद जहांगीर
2 इव्हा कॉर
3 बरुण हालदार
Just Now!
X