आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतील नाटय़परंपरा अभिजात आणि लोकनाटय़ यांमधल्या सीमारेषा ओलांडणाऱ्या आहेत. त्यातूनच या राज्यांत सांस्कृतिक मंथन सुरू राहिले. आंध्र प्रदेशातील याच नाटय़परंपरेतील प्रख्यात नाटय़कर्मी चटला श्रीरामलु यांच्या निधनाने नाटय़कलेकडे मोठय़ा परिप्रेक्ष्यातून बघणारा एक अभ्यासकही आपण गमावला आहे.
ते रंगकर्मी व लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या नावे नाटकातील किमान १०० भूमिका व अनेक विषयांवरील पुस्तकेही आहेत. त्यांनी नाटय़शाळा सुरू केली होती. व्यंकटेश तसेच नागार्जुन यांच्यासारखे अभिनेते त्यांच्या तालमीत घडले. आंध्र नाटय़कला परिषदेचा उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार त्यांना दोनदा मिळाला तसेच मनुष्यबळ विकास विभागाची विद्यावृत्ती मिळालेले ते आंध्रातील पहिले कलाकार होते. लंडन येथील ‘ब्रिटिश ड्रामा लीग’ या संस्थेने त्यांना १९७० मध्ये निर्माता व उत्कृष्ट नाटय़शिक्षक म्हणून गौरवले होते. यावर कळस चढला तो १९८२ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार लाभल्याने.
या साऱ्याची सुरुवात साधीच झाली होती. सरकारी कर्मचाऱ्यांकडून सर्जनशील क्षेत्रात मोठी कामगिरी झाल्याची जी दुर्मीळ उदाहरणे आहेत, त्यापैकी ते एक. मूळचे विजयवाडा येथील असलेले श्रीरामलु हे सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरचे पहिले उद्घोषक होते! आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे १९५० नंतर नाटय़कला वेगाने आकार घेत गेली. हैदराबाद, गुंटूर, बापटला, विजयवाडा येथे एकूण २०० नाटय़ संस्था होत्या, त्यापैकी आता ६० क्रियाशील आहेत. ‘रसरंजनी’ ही त्यांनी स्थापन केलेली साहित्य व सांस्कृतिक संस्था. ‘रसरंजनी’चे या क्षेत्रातील काम मोठे होते. त्यांनी १७ वर्षांत दोन हजार कलाकृती सादर केल्या. त्यांचे ‘मारो मोहेंजोदारो’ हे नाटक विशेष गाजले.
श्रीरामलु यांनी ‘न्यायम कावली’ व ‘स्वप्ना’ या चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. मात्र पडद्यावर त्यांचा जीव रमला नाही. पुढे तेलुगू चित्रवाणी व चित्रपट क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काम केले, तेवढेच. ‘‘कला व समाजात सांस्कृतिक भ्रष्टाचार असतो त्याला नाटय़कला बळी पडत आहे, आर्थिक संपन्नता आली तरी सांस्कृतिक संपन्नता येतेच असे नाही,’’ असे त्यांचे मत होते. ही कला स्वत:पुरती मर्यादित न ठेवता त्यांनी आंध्रच्या चारही विद्यापीठांतून नाटय़कला शिकवण्याचे काम केले होते. त्यांच्या निधनाने एक खरा नाटय़प्रेमी कलाकार हरपला आहे.