‘छळाकडून बळाकडे’ असा प्रवास केलेल्या इस्रायलबद्दल अनेकांना कुतूहलयुक्त कौतुक असते. मात्र हिटलरी छळातून मुक्त होऊन राष्ट्र म्हणून बळ कमावल्यानंतरही इस्रायलने पॅलेस्टाईन व गाझा किनारपट्टीतील लोकांचा छळच आरंभला, हेही उघड आहे. इस्रायलच्या निर्मितीपासून पॅलेस्टिनी लोकांवर झालेल्या अत्याचारापर्यंतच्या कहाण्या जगभरातील लेखकांनी जगासमोर आणल्या आहेत. इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांचा इतिहास बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अमेरिका-इंग्लंडसारख्या बडय़ा देशांनी मदत केली, हेही अनेक पुस्तकांतून वाचायला मिळाले आहे. या लेखकांपैकी एक युरी अव्हेन्री हे इस्रायलमधील एक नावाजलेले पत्रकार, राजकीय नेते आणि लेखक होते.  स्वतंत्र पॅलेस्टाईनला मान्यता द्यावी या मताचे ते कट्टर समर्थक होते. त्यांनी स्वदेश- स्वधर्माचा रोष पत्करून सत्याची बाजू लावून धरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेल्मट ऑस्टरमन हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म जर्मन ज्यू कुटुंबात झाला.नंतर ते ब्रिटिशांचा अंमल असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये ते स्थलांतरित झाले. हिटलर तेव्हा नुकताच सत्तेवर आला होता. तेव्हा हेल्मट यांनी आपले नाव बदलून युरी असे ठेवले. नंतर ते लष्करात दाखल झाले. १९४८ च्या अरब-इस्रायल युद्धात त्यांनी भाग घेतला. लिखाणाची आवड असल्याने ते युद्धभूमीवरून ‘हारेत्झ’या दैनिकासाठी लिखाणही करत. या सर्व वार्तापत्रांचे ‘इन द फील्ड्स ऑफ फिलिस्तिया’ या नावाने पुस्तकही निघाले. १९५० मध्ये युरी व त्यांच्या तिघा मित्रांनी ‘हाओलम हाझे’ हे साप्ताहिक सुरू केले. अत्यंत स्पष्ट आणि परखड लिखाण ते करत असल्याने त्यांचा स्तंभ लोकप्रिय झाला होता. या लिखाणातून त्यांच्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आले. एका गुंडाने त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांच्या हाताची बोटे तोडण्यात आली. अशी अनेक अनेक संकटे आली तरी पत्रकारितेचा धर्म त्यांनी सोडला नाही. युरी यांनी आपली राजकीय कारकीर्द ज्यूवादी- झायोनिस्ट चळवळीतून सुरू केली. भूमिगत राहून ब्रिटिश आणि पॅलेस्टिनी अरबांशी संघर्ष करणारी ही चळवळ होती. मात्र नंतर या चळवळीने इतरांवर दहशत बसविणारी, अन्याय्य हत्या करून जमीन ओरबाडण्याची कृत्ये सुरू झाल्याने ते या चळवळीतून बाहेर पडले. इस्रायलने १९८२ मध्ये लेबनॉनवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे अध्यक्ष यासर अराफत यांची भेट घेऊन वाद ओढवून घेतला होता. १९९३ मध्ये युरी यांनी ‘गुश शॅलोम’ ही शांती आघाडी स्थापन केली.  इस्रायलमध्ये उजव्या आणि कट्टर धर्माध पक्षांचा जोर वाढत असताना युरी यांनी नेहमी धर्मनिरपेक्षता आणि शांततेचाच पुरस्कार केला. हमास तसेच गाझा पट्टीतील पुरोगामी पॅलेस्टिनी गटांशीही बोलणी करण्यात काहीही गैर नाही हेच ते सांगत असत.  ते दोन वेळा पार्लमेंटवरही निवडून गेले. द सोल्जर्स टेल- द ब्लडी, इस्रायल विदाऊट झायोनिझम, माय फ्रेंड, द एनिमी ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. कायम शांततेचा पुरस्कार करणारे अव्हेन्री गेल्या सोमवारी निवर्तले, पण त्याआधी त्यांनी आपल्या साप्ताहिकातील स्तंभ लिहून पूर्ण केला होता.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer uri avnery
First published on: 25-08-2018 at 03:46 IST