सिद्धहस्त चिनी लेखिका, नाटककार, भाषांतरकार अशी त्यांची ओळख. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या त्यांनी लिहिलेल्या आठवणी जरी काही मर्यादा पाळून लिहिल्या असल्या तरी तेथील व्यवस्थेवर अप्रत्यक्ष भाष्य करतात. या लेखिका म्हणजे यांग जियांग. त्यांचे वयाच्या १०४व्या वर्षी नुकतेच निधन झाले.
१९६६ मध्ये वैचारिक शत्रूंना नष्ट करण्यासाठी माओ झेंडाँग यांनी सांस्कृतिक क्रांतीचे हत्यार उपसले त्या उलथापालथीच्या काळात त्यांचे पती कियान झोंगशू यांच्यासह त्या साक्षीदार ठरल्या. कियान झोंगशू यांची ‘फोर्ट्रेस बिसीज्ड’ ही कादंबरी विशेष गाजली. यांग यांनी डॉन क्विसॉटचे त्यांनी केलेले भाषांतर त्यांच्या साहित्यिक नावलौकिकास साजेसेच. त्यांना स्पॅनिश भाषाही येत होती. साहित्य भाषांतरित रूपात आणण्यासाठी मूळ भाषा चांगली यायला हवी असे त्यांचे मत होते. ‘सिक्स चॅप्टर्स फ्रॉम माय लाइफ- डाऊनअंडर’ हे त्यांचे पुस्तक १९८१ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात हेनान प्रांतातील आठवणी समतोलाने मांडल्या आहेत. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या काळात बुद्धिमंतांचे जीवन त्यातून डोकावते. यांग जियांग यांचा जन्म बीजिंगमधला. त्या वेळी चीनमधील राजेशाही अखेरच्या घटिका मोजत होती. यांग यांनी सूचो विद्यापीठातून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. नंतर सिंगहुआ विद्यापीठात त्यांची भेट भावी जोडीदार म्हणजे क्वियान झोंगशू यांच्याशी झाली. क्वियान झोंगशू हे काही काळ ब्रिटनमध्ये होते. त्यानंतर पॅरिसमध्ये या जोडप्याने एक वर्ष काढल्यानंतर ते चीनला परत आले. १९९८ पासून त्यांनी त्यांचे लेखक पती कियान यांच्या अप्रकाशित लिखाणाचा संग्रह संपादित करण्याचे काम सुरू केले होते, ते बऱ्यापैकी झालेही आहे. वयाच्या ९६व्या वर्षी ‘रिचिंग द ब्रिंक ऑफ लाइफ’ हे त्यांच्या जीवनतत्त्वज्ञानावरचे पुस्तक प्रसिद्ध झाले, तसेच ‘मार्जिनालिया ऑफ लाइफ’ हे पुस्तक त्यांच्या पतीनेही लिहिले होते. त्यांची ‘अ‍ॅज यू विश’ (१९४४), ‘टेकिंग ट्र फॉर फॉल्स’ (१९४५) व ‘क्विल्टस इन दी विंड’ (१९४७) ही नाटके त्यांनी ‘अन रोमँटिक’ पद्धतीने लिहिली. शिंगहुआ विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. त्यांचे काही लेखन ‘स्प्रिंग मड’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. एकूणच या पती-पत्नींनी चीनच्या साहित्यसंस्कृतीत मोलाची भर टाकली. शांघायमधील युद्धग्रस्त काळात यांग यांनी काही कॉमेडीज लिहिल्या. १९४९ मध्ये कम्युनिस्टांनी सत्ता घेतली तेव्हा यांग यांनी बरेच लेखन केले. त्यात प्रायोगिकता अधिक होती. त्यांना यशकीर्तीची अजिबात अभिलाषा नव्हती. त्यांची कन्या कर्करोगाने वारली, त्याआधी पतीचे निधन झाले. त्या वेदना त्यांनी ‘वुई थ्री’ या आठवणींमध्ये प्रवाहित केल्या आहेत. त्या आधी त्यांनी ‘बाप्तिझम’ ही कादंबरी लिहिली होती. त्यांच्या निधनानंतर चीनच्या वेबो या संकेतस्थळावर त्यांच्या नावाने अनेकांनी त्यांच्या कार्याचा शोध घेतला हे विशेष!