योगासने आणि आरोग्य यांचा संबंध भारतीयांना कसा मनापासून पटला आहे आणि सरकारचा पाठिंबा असो वा नसो, या देशात योगाभ्यास कसा सर्वदूर रुजलेला आहे, याचे प्रतीक ठरलेल्या व्ही. नानम्मल २६ ऑक्टोबर रोजी कोइमतूरमध्ये निवर्तल्या. वयाची ९९ वर्षे पूर्ण केलेल्या या आजी, शंभरी सहज गाठतील असे साऱ्यांना वाटत होते. पण पडल्याचे निमित्त झाले आणि गेले सुमारे ३० दिवस त्यांना हालचाल अशक्य झाली होती. अर्थात, २०१८ मध्ये योगाच्या क्षेत्रात महत्त्वाच्या कामगिरीसाठी ‘पद्मश्री’च्या मानकरी ठरलेल्या नानम्मल यांनी काही निव्वळ दीर्घायुष्याचे साधन म्हणून योगाकडे पाहिले नव्हते..

योग हा त्यांच्या आयुष्याचा भागच होता. अगदी वयाच्या आठव्या वर्षांपासून.. म्हणजे साधारण सन १९२८-२९ पासून. राज्यकर्त्यांना योगाबद्दल ममत्व वाटत नव्हते, लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात नेहरू ‘संपूर्ण स्वातंत्र्या’चा ठराव मांडत होते, अशा त्या काळात नानम्मल यांचे वडील आपल्या मुलीला योगासने शिकवीत होते. नारळ-काजूच्या बागा, जोडीला योग व ‘सिद्ध’ उपचारपद्धतीचा अभ्यास आणि त्यास जोड म्हणून ब्रिटिशकाळातील ‘रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर’ची सनद, हे वडिलांचे भांडवल. त्यातून योगाभ्यासाचा वारसा नानम्मल यांनी सांभाळला. शिक्षण फारसे नाही, संसार लवकर सुरू झाला, तरीही योगाला अंतर दिले नाही. त्यातूनच, ‘‘माझी सहा बाळंतपणे झाली. सर्व ‘नॉर्मल’. योगामुळेच गर्भाशय चांगले राहते,’’ असे अनुभवाधारित ज्ञान त्यांना मिळत गेले. शेजारपाजारच्या महिलांना फावल्या वेळात योगासने शिकवणाऱ्या नानम्मल वयाच्या साठीनंतर लहान मुलांनाही आजीच्या मायेने शिकवू लागल्या. पंचाहत्तरीनंतर, २००३ साली पहिल्यांदा त्यांनी एका योगासन स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षीस मिळवले. मग त्यांना अशा स्पर्धात उतरण्याचा- आणि अर्थातच बक्षिसांनाही त्यांच्याकडे येण्याचा- छंदच लागला! त्यांच्याकडून योगासनांचे प्राथमिक धडे घेतलेले ६०० जण आज योगशिक्षक झाले आहेत. ‘दहाएक हजार स्त्रीपुरुषांना मी शिकवले असेल’ असे नानम्मल सहज सांगत. सरकारने त्यांची ‘पद्मश्री’साठी निवड केल्याने या सातत्याला दाद मिळाली आणि जगभर फिरून योगप्रसार करण्याऐवजी एकाच गावात राहून, योगासने शिकवत राहण्याच्या निष्ठेलाही फळ मिळाले!